कोल्हापूर : शिक्षण क्षेत्राला आयुष्य समर्पित केलेले डॉ. डी. वाय. पाटील हे राजकारणातही तितकेच प्रभावी आणि यशस्वी व्यक्तिमत्व ठरले. कार्यकर्ता, महापौर, आमदार ते तीन राज्याचे राज्यपाल, असा विस्मयचकित करणारा प्रवास डॉ. डी. वाय पाटील यांचा आहे. काँग्रेसच्या विचाराचा निस्सीम कार्यकर्ता – नेता अशी त्यांची अखेरपर्यंत ओळख राहिली. त्यांच्या पुढील पिढ्यांनी ही हाच विचार जपला आहे.

कोल्हापुरातील कसबा बावड्यातील श्रीराम सेवा सोसायटीची निवडणूक जिंकून ते संस्थेचे अध्यक्ष झाले. तेथूनच त्यांच्या राजकीय कारकीर्दीची सुरुवात झाली. पुढे कोल्हापूर पालिकेच्या निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार म्हणून ते विजयी झाले. १९५७ ते १९६२ या काळात डॉ. डी. वाय. पाटील हे काँग्रेसकडून कोल्हापूरचे महापौर होते. १९६७ आणि १९७२ साली ते पन्हाळा विधानसभा मतदारसंघातून विधानसभेत आमदार म्हणूनही निवडून गेले होते.

भाजपच्या सत्ता काळातही राज्यपाल!

पुढे १९८३ ला विनाअनुदानित तत्त्वावर अभियांत्रिकी व वैद्यकीय महाविद्यालयांचा निर्णय झाला आणि त्यांनी अभियांत्रिकी महाविद्यालयाची मुहूर्तमेढ रोवली. नंतर वैद्यकीय, आर्किटेक्चर, फार्मसी, कृषी इत्यादी अनेक महाविद्यालये सुरू केली. शिक्षण क्षेत्रामध्ये त्यांनी स्वतःला झोकून दिले. सक्रिय राजकारणामध्ये ते कार्यरत नसले तरी त्यांनी काही राज्यात राज्यपाल म्हणून त्यांनी प्रभावी कामगिरी बजावली. डी. वाय. पाटील हे २००९ ते २०१३ या काळात त्रिपुरा, तर २००३ ते २०१४ या काळात बिहराचे राज्यपाल होते.

शिवाय, त्यांच्याकडे पश्चिम बंगालच्या राज्यपालपदाचाही काही काळ कार्यभार होता. भाजपप्रणित एनडीए सरकार केंद्रात सत्तेत आल्यानंतर अनेक राज्यातील राज्यपालांची उचलबांगडी करण्यात आली. त्यांच्या ठिकाणी नवे राज्यपाल नियुक्त करण्यात आले. मात्र, राजकारणाच्या पलिकडचे व्यक्तिमत्त्व असलेल्या डॉ. डी. वाय. पाटील यांचे राज्यपालपद कायम ठेवण्यात आले होते.भारत सरकार या नेत्यांचा ‘पद्मश्री’ हा किताब देऊन गौरव केला होता.

राजकीय चकवा

राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या विचारांची जपणूक डॉ. डी. वाय. पाटील यांनी कायम ठेवली. तथापि जुलै २०१९ मध्ये राजकारणातील या दिग्गज व्यक्तिमत्वाने मुंबईत राष्ट्रवादी कार्यालयाची वाट धरल्याने खळबळ उडाली होती. त्यांच्या या भूमिकेची तेव्हा चर्चा अल्पकाळ झाली होती. परंतु, पुढे त्यांनी नेहमी काँग्रेसशी असलेले नाते टिकवून ठेवले होते.

नाते जडले काँग्रेसशी

डॉ. डी. वाय. पाटील यांची वैचारिक जाळ नाळ अखेरपर्यंत काँग्रेस पक्षाशी जुळली होती. पुढच्या पिढ्यातही हीच वैचारिक बांधिलकी दिसून आली. अलीकडच्या काळात काँग्रेसला उतरतील कळा लागली असताना, अनेकांनी हा पक्ष सोडण्याची भूमिका घेतली असताना पाटील घराण्यातील पुढील पिढ्यांनी काँग्रेसचा तिरंगा हाती कायम ठेवला. त्यांचे सुपुत्र सतेज पाटील हे आमदार, मंत्री झाले तर नातू ऋतुराज पाटील यांनी विधानसभेमध्ये जाण्याची कामगिरी केली.