सातारा: फलटण उपजिल्हा रुग्णालयातील तत्कालीन तदर्थ वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेंद्र रूपनवर यांच्या आत्महत्येनंतर संबंधितांच्या अटकेच्या मागणीसाठी बुधवारी कुटुंबासह संतप्त जमावाने उपजिल्हा रुग्णालयासमोर निदर्शने करत घेराव घातला. या वेळी डॉ. रूपनवर यांचा मृतदेह रुग्णालयाच्या आवारात ठेवल्यामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. यावेळी संतप्त जमाव आणि पोलिसांमध्ये वादाचा प्रकारही झाला. दरम्यान प्रांताधिकारी प्रियंका आंबेकर यांनी घटनास्थळी भेट देऊन कुटुंबीयांच्या मागण्या जिल्हाधिकाऱ्यांमार्फत तातडीने शासनाकडे पाठवण्याचे आश्वासन दिले. या वेळी उपविभागीय अधिकारी धन्यकुमार गोडसे यांच्या नेतृत्वाखाली मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

दरम्यान, या आत्महत्येच्या चौकशीसाठी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्याबाबतचा अहवाल जिल्हा पोलीस प्रमुखांकडून शासनाकडे पाठवण्याची कार्यवाही पूर्ण केली जाईल, असे उपविभागीय अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. दुसरीकडे सार्वजनिक आरोग्य विभागानेही या प्रकरणी ठोस पावले उचलली आहेत. आरोग्य सेवा आयुक्त तथा राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या संचालकांनी डॉ. रूपनवर यांच्या पत्नीशी दूरध्वनीवरून संपर्क साधून सांत्वन केले आणि घटनेची माहिती घेतली.आरोग्य सेवा संचालनालयाचे संचालक डॉ. विजय शासन रूपनवर कुटुंबीयांच्या पाठीशी असून तपासात सहकार्य करण्याचे आवाहनही त्यांनी केले.

प्रशासन आणि आरोग्य विभागाकडून निष्पक्ष चौकशीचे लेखी आश्वासन मिळाल्यानंतर उपस्थित संतप्त जमाव शांत झाला. त्यानंतर डॉ. रूपनवर यांचे पार्थिव अंत्यविधीसाठी त्यांच्या मूळगावी फडतरी (मांडवी, ता. माळशिरस) येथे नेण्यात आले. दरम्यान डॉ रूपनवर यांनी वरिष्ठांचा दबाव आणि कामाच्या ठिकाणी होणाऱ्या मानसिक छळामुळे आत्महत्या केली. या घटनेला आरोग्य उपसंचालक डॉ भगवान पवार, वैद्यकीय अधीक्षक डॉ लीला मदने, माजी आरोग्य मंत्र्याचा कथित स्वीय सहाय्यक प्रसाद कोंडे देशमुख, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षांचा स्वीय सहाय्यक दत्तात्रय मोहिते आणि कुमार परदेशी हे जबाबदार आहेत. या सर्वांना अटक करावी अशी मागणी डॉ. रुपनवर यांचा भाऊ सागर रुपनवर यांनी केली आहे.

डॉ. रुपनवर यांची आत्महत्या ही अतिशय दुर्दैवी घटना आहे. गुन्हा नोंद करून पुढील तपास सुरू आहे. वैद्यकीय अधीक्षकांवर निलंबनाची कारवाई केली आहे. दोषींना नक्कीच शिक्षा होईल. – प्रकाश आबिटकर, आरोग्यमंत्री

राजकीय दबाव आणि कामाच्या ठिकाणी होणाऱ्या मानसिक छळामुळे निवासी डॉक्टर सुरक्षित नाहीत. डॉ. रुपनवर यांच्या उत्तरीय तपासणीचा अहवाल येताच आमच्या आंदोलनाची पुढील दिशा ठरेल. दोषींवर सात दिवसांत कारवाई करावी. – डॉ. अथर्व शिंदे, महाराष्ट्र निवासी डॉक्टर संघटना(मार्ड), अध्यक्ष (महाराष्ट्र)

फलटण उपजिल्हा रुग्णालयातील तत्कालीन वैद्यकीय अधिकारी डॉ. रूपनवर यांच्या मृत्यूप्रकरणी दोषींवर नियमानुसार कठोर कारवाई केली जाईल, या प्रकरणाची निष्पक्ष चौकशीची केली जाईल. -डॉ. विजय कंदेवाड संचालक,आरोग्यसेवा (प्राथमिक) सार्वजनिक आरोग्य विभाग, मुंबई</strong>