सांगली : मद्यधुंद अवस्थेत ट्रक चालवत दोन वाहनांना धडक देऊन पोलीसांशीही हुज्जत घालणाऱ्या चालकाचा प्रकार मिरजेजवळील तानंग फाटा येथे घडला. या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र तीन वाहनांचे सुमारे दीड लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

औद्योगिक वसाहत पोलीस ठाण्यातून गुरुवारी मिळालेल्या माहितीनुसार, सतीश सरगर (वय ३६, रा. अवधूत कॉलनी, कुपवाड) हा मालट्रक (केए २३ बी ४५०४) घेऊन मिरजेहून तासगावच्या दिशेने जात होता. ट्रक चालकाने मद्यप्राशन केलेल्या अवस्थेत वाहन चालविल्याचा आरोप आहे.

तानंग फाटा परिसरात भरधाव ट्रकने समोरून येणाऱ्या महिंद्रा पिकअप (एमएच ४५ एएक्स १७२७) आणि दुचाकी (एमएच १० डीजे ९४६९) यांना जोरदार धडक दिली. धडकेनंतर दोन्ही वाहने रस्त्याच्या कडेला उलटली. अपघातात ट्रकचेही नुकसान झाले.

घटनेनंतर परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, पोलिसांनी ट्रक अडविण्याचा प्रयत्न केला असता चालकाने शासकीय कर्तव्यात अडथळा आणत पोलिसांना शिवीगाळ केल्याचेही समोर आले आहे. या प्रकरणी औद्योगिक वसाहत पोलिसांनी चालकाविरोधात गुन्हा दाखल करून पुढील कारवाई सुरू केली आहे.