कोल्हापूर : पद्मश्री डॉ. ज्ञानदेव यशवंतराव तथा डॉ. डी. वाय. पाटील यांचे मंगळवारी निधन झाले. ते ९० वर्षांचे होते. ते ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ, राजकारणी आणि बिहार, त्रिपुरा व पश्चिम बंगालचे माजी राज्यपाल होते. महाराष्ट्रामध्ये शिक्षणसम्राट ह्या उपाधीने ओळखल्या जाणाऱ्या डी. वाय.पाटील ह्यांना १९९१ साली पद्मश्री हा पुरस्कार देण्यात आला होता. त्यांचा जन्म २२ ऑक्टोबर १९३५ रोजी कोल्हापूरमधील अंबप गावात झाला होता. कोल्हापूरच्या मातीतले रांगडे व्यक्तिमत्त्व होते.

भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सदस्य असलेले डी.वाय. पाटील १९५७ ते १९६२ दरम्यान कोल्हापूर शहराचे महापौर होते. १९६७ व १९७२ साली ते पन्हाळा विधानसभा मतदारसंघामधून विधानसभेवर निवडून आले होते. सर्वसामान्य कार्यकर्त्यांपासून सुरु केलेली राजकीय कारकीर्द पुढे अनेक मोठमोठ्या पदांपर्यंत घेऊन गेली. कार्यकर्ता, महापौर ते अगदी राज्याचे राज्यपाल, असा विस्मयचकित करणारा प्रवास डॉ. डी. वाय पाटील यांचा आहे.

भाजपप्रणित एनडीए सरकार केंद्रात सत्तेत आल्यानंतर अनेक राज्यातील राज्यपालांची उचलबांगडी करण्यात आली. त्यांच्या ठिकाणी नवे राज्यपाल नियुक्त करण्यात आले. मात्र, राजकारणाच्या पलिकडचे व्यक्तिमत्त्व असलेल्या डॉ. डी. वाय. पाटील यांचे राज्यपालपद कायम ठेवण्यात आले होते. तेव्हा डॉ. डी. वाय. पाटील हे बिहारचे राज्यपाल होते.

देश-विदेशात शिक्षण आणि वैद्यकीय संस्था, तसेच नवी मुंबईतील खेळाचे भव्य मैदान असो, ज्या क्षेत्रात पाऊल ठेवले. तिथे ठोस कामगिरी करत आपल्या नावाचं ब्रँड तयार केले. डी.वाय. पाटील ह्यांच्या नावाच्या अनेक संस्था महाराष्ट्रात आहेत. त्यामध्ये पद्मश्री डी.वाय. पाटील विद्यापीठ, सी.बी.डी. बेलापूर, नवी मुंबई, डॉ. डी.वाय. पाटील विद्यापीठ, पुणे, डॉ. डी.वाय. पाटील विद्यापीठ, कोल्हापूर, डॉ. डी.वाय. पाटील विद्यापीठ, पुणे, आंबी या विद्यापीठांचा समावेश आहे.

शेकडो शिक्षण संस्थांचेव्यापक नेटवर्क असलेला व गुणवत्तेमुळेराज्यातच नव्हे, तर देशभरात ओळखला जाणारा डी. वाय. पाटील ग्रुप शैक्षणिक वटवृक्ष बनला आहे. ग्रुपच्या विविध संस्थांमधून शिक्षण घेऊन बाहेर पडलेलेलाखो विद्यार्थी आज देश-विदेशांत उच्चपदावर कार्यरत आहेत. विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्याला आकार देतानाच परंपरा जतन करून सुजाण नागरिक बनवण्यासाठी ग्रुपतर्फे नेहमीच प्रयत्न केला जातो.

‘जे कराल तेमनापासून करा. जिथे जाल तिथेसर्वोच्च बना,’ असा संदेश पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील नेहमी देत असतं.डॉ. डी. वाय. पाटील यांच्या निधनामुळे शैक्षणिक महामेरू हरपला -कुलगुरू डॉ. राजनीश कामत

ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांच्या निधनामुळे शैक्षणिक क्षेत्रात उत्तुंग कामगिरी बजावणारे महामेरू व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेले आहे, अशी शोकभावना शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. राजनीश कामत यांनी व्यक्त केली त्यांच्या निधनामुळे शिवाजी विद्यापीठ परिवारावर दुःखाची छाया पसरली आहे. डॉ. पाटील यांना चिरशांती लाभो, अशी भावनाही कुलगुरूंनी व्यक्त केली आहे.