दयानंद लिपारे

कोल्हापूर : जून संपत आला तरी पावसाने दडी दिली असल्याने कृषी – ग्रामीण अर्थकारण अडचणीत आले आहे. पेरणीसाठी लागणारे बियाणे, खते यांची उलाढाल ठप्प झाली आहे. पेरणी झालेल्या ठिकाणी पाऊस कधी येणार याच्या चिंतेत शेतकरी सापडला आहे. ग्रामीण भागाच्या अर्थकारणाला ओहोटी लागली आहे.

खरीप पिकाची तयारी मेअखेरीस केली जाते. पश्चिम महाराष्ट्र मे महिन्याच्या मध्यास सोयाबीनची पेरणी केली जाते. खरिपासाठी आवश्यक असणाऱ्या बियाणांच्या खरेदीची नोंदणी डिसेंबर महिन्यापासूनच होत असते. बियाणे, खत विक्रेते सहा महिने आधीच आगाऊ मालाची नोंदणी करीत असतात. त्याप्रमाणे आगाऊ पैसे बियाणे उत्पादक कंपन्यांकडे पाठवले जातात. बियाणांची विक्री झाली की त्यातून येणाऱ्या पैशातून खतांचे व्यवहार करण्याचा विक्रेत्यांचा शिरस्ता आहे. या विक्रेत्यांकडे बियाणे पोहोचली आहेत. पेरणीचे प्रमाण पाच टक्केही झालेली नसल्याने त्यांची चिंता वाढली आहे. 

पावसाने अर्थकारण बिघडवले

दरवर्षीच्या अनुभवानुसार जून मध्यापर्यंत बियाण्यांची विक्री झालेली असते. तोपर्यंत पावसानेही चांगला हात दिलेला असतो. या वर्षी जून महिन्यात राज्याच्या बऱ्याच भागांमध्ये एक-दोन दिवस जोरदार पाऊस झाला; पण त्यानंतर पावसाने झुकांडी दिली आहे. हवामान विभागाने पहिल्या अंदाजात र्नैऋत्य मोसमी वाऱ्यांद्वारे जून ते सप्टेंबर या महिन्यांत देशभरात ९९ टक्के पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त केली होती. सुधारित अंदाजात भारतीय हवामानशास्त्र विभागाने या वर्षी १०३ टक्के पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त केली होती. यानुसार शेतकऱ्यांनी पेरणीची तयारी केली होती; तर विक्रेत्यांनी बियाणांची सज्जता ठेवली होती. पावसाचे अंदाज फसल्याने कृषी- ग्रामीण अर्थकारणही गाळात रुतले आहे. कोटय़वधीची उलाढाल ठप्प झाली आहे.

विक्रेते अडचणीत

पावसाने दडी मारल्यामुळे पेरणीची कामे खोळंबली आहेत. बियाणे खरेदीसाठी शेतकरी बियाणे, खत विक्रेत्यांकडे फिरकत नाही. विक्रेत्यांनी दरवर्षीचा अंदाज लक्षात घेऊन लाखो रुपयांची गुंतवणूक यामध्ये केलेली आहे. बियाणे जूनच्या मध्यास विकल्यानंतर त्यातून खतांची मागणी विक्रेते करतात. आता बियाणाचीच विक्री झाली नसल्याने पैसे उपलब्ध झालेले नाहीत. यामध्ये विक्रेत्यांची मोठय़ा प्रमाणात रक्कम अडकून पडली आहे. खताची मागणी करण्यासाठी हाती पैसा उपलब्ध नसल्याने खत, बियाणे विक्रेते आर्थिकदृष्टय़ा अडचणीत सापडले आहेत. बियाणे विक्रेत्यांना एका पिशवीमागे सुमारे २५ रुपयांचा नफा मिळतो; पण या वेळी विक्रीच झाली नसल्याने नफ्याची रक्कम अत्यंत कमी आहे.

शेतमजूर चिंताक्रांत

 शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थितीही तोळामासा बनली आहे. यंदा टोमॅटोने  शेतकऱ्यांना चांगला हात दिला. केळी, द्राक्षे या नगदी पिकांना अगदीच कमी दर मिळाला. काही भागांत एका टनावर तितकीच द्राक्षे मोफत असे करून ती खपवली गेली. पंढरपूरजवळील कासेगाव येथील एका शेतकऱ्याने तर द्राक्षासह बाग मातीत गाडून टाकली. दुसरीकडे खतांच्या किमतीमध्ये दुप्पट वाढ झाली आहे. युरियाची तीन हजार रुपये असणारी किंमत अवघ्या दोन महिन्यांत सहा हजार रुपये झाली आहे. त्यामुळे पेरणी केली तरी खतांसाठी पैसे कसे उपलब्ध करायची याचीही शेतकऱ्यांना चिंता आहे. पेरणी झाल्यानंतर बहरलेली पिके पाहून शेतकऱ्यांचे मन उल्हसित होते. त्या आशेने पुढील दोन-तीन महिन्यांत चांगले पीक येऊन काही रक्कम पदरात पडेल अशी अपेक्षा असते. मात्र या वेळी पेरणी झाली नसल्याने पुढे काय करायचे याची चिंता लागली. आभाळाकडे डोळे लावून पाऊस कधी पडणार याची प्रतीक्षा करणे इतकेच त्याच्या हाती काहीच उरले आहे. जूनमध्ये शेतीच्या कामांना वेग येतो. या हंगामात काम करून चार पैसे मिळवण्याची शेतमजुरांना संधी असते; पण तीही दवडली गेल्याने गरिबांचे हाल आहेत. पाऊस लांबल्याने आणि आकाशात केवळ ढग असल्याने रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. उसाची लागवड मोठय़ा प्रमाणात केली जाते. आता त्यास पाण्याची गरज असताना विहीर, नदीच्या पाण्याने तळ गाठला असल्याने ऊस उत्पादक शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.

जून महिन्यामध्ये कृषी अर्थकारणाला गती आलेली असते. बियाणांची दमदार विक्री होत असते. पाठोपाठ खतांची मागणी ही वाढलेली असते. या माध्यमातून खत, बियाणे विक्रेत्यांच्या अर्थकारणाला चालना मिळत असते. या वर्षी जून संपत आला तरी पावसाचा पत्ता नसल्याने खत, बियाणे यांची उलाढाल ठप्प झाली असल्याने कृषी- ग्रामीण अर्थकारण पूर्णत: कोलमडले आहे.

– प्रशांत तावरे, विक्री प्रतिनिधी, वनिता अ‍ॅग्रोकेम