सातारा : उद्धव ठाकरे गटाच्या खासदारांसोबत आमची बैठक झाली नसून हे वृत्त पूर्णपणे निराधार असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यांच्या दरे तर्फ तांब (ता.महाबळेश्वर) या त्यांच्या गावी तीन दिवसाच्या दौऱ्यावर आले आहेत. दरम्यान त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना ‘ऑपरेशन टायगर’ची चर्चा निराधार असल्याचे सांगत माध्यमांमधून केले जात असलेले सर्व दावे फेटाळले.
यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना शिंदे म्हणाले की, कुठल्यातरी बातम्या करता, त्याची शहानिशा तरी करायला पाहिजे. माझी कोणत्याही खासदारांसोबत बैठक झालेली नाही. मी लपून-छपून कुठल्याही बैठका करत नाही. माझे सगळे उघड काम असते. आम्ही उबाठाच्या खासदारांना भेटलो अशा बातम्या चालवल्या जात आहेत. परंतु, त्यात कोणतेही तथ्य नाही. ती केवळ अफवा आहे. त्यामुळे सनसनाटी निर्माण करण्यासाठी अशा पद्धतीच्या बातम्या देणे माध्यमांनी टाळले पाहिजे. शहानिशा करून खात्री करूनच माध्यमांनी वस्तुनिष्ठ बातम्या दिल्या पाहिजेत अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिली.
राज्यात ‘ऑपरेशन टायगर’ राबवून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार फोडण्यासाठी बुधवारी रात्री ठाण्यात एकनाथ शिंदे आणि ठाकरेंच्या खासदारांची गुप्त बैठक पार पडल्याचे वृत्त काही माध्यमातून दाखवले जात होते. याची राजकीय वर्तुळात आज दिवसभर मोठी चर्चा होत आहे. यावर शिंदे यांनी वरील प्रतिक्रिया दिली.
गावातील बंगल्याबाहेर गर्दी
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गावी आल्यानंतर जनता दरबार घेत असतात. दरम्यान १०५ गावातील नागरिक विविध कामे घेऊन त्यांच्याकडे येत असतात. आजही नागरिकांच्या अनेक समस्यांचा निपटारा त्यांनी केला. उपमुख्यमंत्री शिंदे हे सायंकाळी सातच्या सुमारास उत्तेश्वर (ता.महाबळेश्वर) येथे दर्शनासाठी गेले. यावेळी त्यांनी मंदिर परिसरातील कामाची पाहणी केली.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘ऑपरेशन टायगर’ला गती दिली असून ठाकरे गटाच्या सात खासदारांना गळाला लावल्याची जोरदार चर्चा आहे. शिंदे यांनी ठाकरेंच्या खासदारांसोबत ठाण्यातील एका कंपनीच्या आवारात नुकतीच पहाटेपर्यंत बैठक घेतल्याचे वृत्त बाहेर पडल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. मात्र अशी कोणतीही बैठक झाली नसल्याचा दावा करीत शिंदे यांनी उबाठाच्या खासदारांसोबत झालेल्या कथित बैठकीचे वृत्त पूर्णपणे निराधार असल्याचे म्हटले आहे.
मी माझ्या खासदारांनाच भेटत नाही. त्यांनाच ऑनलाईन भेटतो. त्यांना भेटण्यासाठीच माझ्याकडे वेळही नाही. मी जे काही करायचं आहे ते खुल्या पद्धतीने करतो. आड पडदा ठेवून काहीही करत नाही असे शिंदे यांनी म्हटले आहे.
शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे आठ खासदार हे शिवसेना शिंदे गटात जाणार असून त्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ऑपरेशन टायगर राबविले असल्याची चर्चा आहे. मात्र भाजप नेवृत्वाकडून शिवसेना खासदार फोडण्यास नकार असल्याने ही प्रक्रिया थंडावली होती. मात्र अशा बातम्या बाहेर आल्यानंतर शिंदे यांनी आज साताऱ्यातील दरे गावी अशा बातम्या बाबत नाराजी व्यक्त करत बातम्या पसरवू नका असे सांगितले. अशा कोणत्याही बैठकीचे वृत्त निराधार असल्याचेही त्यांनी आज साताऱ्यात म्हटले आहे.
