सातारा : गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार ही योजना शेतकऱ्यांसह धरण क्षेत्रातील लाभार्थ्यांना खूप उपयोगी आहे. या योजनेची व्याप्ती राज्यात वाढवणार असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालय व नाम फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने कोयना धरणातील गाळ काढण्याचा कार्यक्रम हाती घेतला आहे. याचा शुभारंभ दरे (ता. महाबळेश्वर) येथे उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते झाला. यावेळी जिल्हाधिकारी संतोष पाटील, उपवनसंरक्षक अमोल सातपुते, वाईचे प्रांताधिकारी डॉ. योगेश खरमाटे, सातारचे प्रांताधिकारी आशिष बारकुल यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
उन्हाळ्यामध्ये धरणाची पाणी पातळी कमी होते. पाणी पातळी कमी झाल्यामुळे धरणातील गाळ काढल्यानंतर पाण्याची क्षमता ही वाढते व गाळाचा उपयोग शेतीमध्ये केला जातो. यामुळे शेती अधिक सुपीक व कृषी उत्पन्न जास्त देते. त्यामुळे ही योजना शेतकऱ्यांसह धरण क्षेत्रातील लाभार्थ्यांसाठी फार महत्त्वाची आहे.
तरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी धरणांमधील व तलावांमधील गाळ काढून तो आपल्या शेतात टाकावा व आपली शेतजमीन सुपीक करून कृषी उत्पन्न वाढवावे, असे आवाहनही उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी केले. प्रारंभी महात्मा जोतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
वासोटा परिसराची पाहणी
उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दरे दौऱ्यादरम्यान कोयना जलाशयात बोटीद्वारे विहार करून ऐतिहासिक महत्त्व असलेल्या किल्ले वासोटा परिसराची पाहणी केली. या निसर्गसंपन्न परिसरात आगामी काळात ‘नाईट टुरिझम’ आणि पाण्यातील रुग्णवाहिका (वॉटर ॲम्बुलन्स) सुविधा उपलब्ध करून देण्याचे नियोजन असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले.
कोयनेच्या पर्यटनाला चालना देण्यासाठी हे पाहणी दौरे करण्यात आल्याचे सांगण्यात आले. अनेक वर्षांपासून प्रलंबित असणाऱ्या बोंडारवाडी धरणाचा प्रश्न लवकरच सोडवला जाईल, असा विश्वासही शिंदे यांनी व्यक्त केला. दरम्यान पाचवड-खेड राज्य महामार्गाचे काम सुरू असून, बाधित शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळावा यासाठीही प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
