सातारा : अमावस्या-पौर्णिमेला बाहेर पडणाऱ्यांच्या टीकेला उत्तर देण्यास आम्ही बांधील नाही. रोज नवनवीन स्वप्ने पडणाऱ्यांच्या ‘पोटदुखी’वर आणि अफवांवर महायुती सरकार कामातूनच ठोस उत्तर देईल, असा जोरदार टोला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला. निधी वाटपावरून नाराजीच्या चर्चा पूर्णपणे फेटाळत, ‘मी गावी आलो, लंडनला गेलो किंवा दिल्लीला गेलो, तरी माझा प्रत्येक दौरा हा राज्याच्या कामासाठी आणि हितासाठीच असतो,’ असे त्यांनी स्पष्ट केले. दरवर्षीप्रमाणे यंदाही केवळ गणेशोत्सवासाठीच दरे (ता. महाबळेश्वर) या मूळ गावी आल्याचे सांगत त्यांनी शेतात फेरफटका मारला.

‘शेवटी मी शेतकऱ्याचा मुलगा आणि मातीतला माणूस आहे,’ अशा भावना त्यांनी व्यक्त केली. मराठवाडा आणि विदर्भात पावसाच्या खंडाने झालेल्या पिकांच्या नुकसानीवर बोलताना शिंदे म्हणाले की, सरकारने या गंभीर परिस्थितीची दखल घेतली आहे. धाराशिवचे पालकमंत्री, खासदार आणि जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून ५ ऑक्टोबरपासून नुकसानीचे पंचनामे सुरू करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. अतिवृष्टी असो वा दुष्काळ, हे सरकार बळीराजाला कधीही वाऱ्यावर सोडणार नाही. महायुती सरकार संपूर्ण ताकदीने शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे असून, नुकसान भरपाई दिली जाईल.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि मी स्वतः समन्वयाने या संकटाचा सामना करत आहोत.लंडन दौऱ्यात महाराष्ट्राची अस्मिता, मराठीचा डंका आणि ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’सारख्या योजनांचे जागतिक ब्रँडिंग केल्याचे त्यांनी सांगितले. राज्याची निसर्गसंपदा मजबूत करण्यासाठी दरवर्षी मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्याचे धोरण असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

सातारा जिल्हा बँक निवडणूक महायुती म्हणूनच सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीचे पडघम वाजू लागले असून, राजकीय वर्तुळात वेगवेगळी वक्तव्ये केली जात आहेत. यावर भाष्य करताना उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, सातारा जिल्हा बँक ही राज्यातील प्रमुख बँक आहे. या निवडणुकीत पक्षनिहाय चर्चा सुरू असल्या तरी, महायुती म्हणून सर्व घटकपक्ष एकत्र येऊनच ही निवडणूक लढवण्यावर आमचा भर राहील.