सातारा : जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत पातळी सोडून राजकारण करण्यात आले. कोणीही कितीही दबावाचे राजकारण करू द्या. पण तुम्ही घाबरू नका. निर्धाराने लढा असा आदेश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपाचे नाव न घेता साताऱ्यातील सभेत दिला. सातारा येथील गांधी मैदानावरील सभेत उपमुख्यमंत्री शिंदे बोलत होते. यावेळी उद्योगमंत्री उदय सामंत, पालकमंत्री शंभूराज देसाई, आमदार सुहास बाबर, संजीवराजे नाईक निंबाळकर, चंद्रहार पाटील, रवींद्र धंगेकर, शरद कणसे, चंद्रकांत जाधव, रेश्माताई जगताप, हनुमंतराव जगदाळे, योगेश जानकर अंकुश कदम आदी उपस्थित होते.
यावेळी अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य, नगराध्यक्ष, पालिका नगरसेवक आदी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
एकनाथ शिंदे यांच्या सभेस नुकत्याच झालेल्या सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीतील गोंधळाची पार्श्वभूमी होती. शिंदे म्हणाले, की सातारा ही माझ्यासाठी स्वाभिमानाची, शूर वीरांची भूमी आहे. मी उपमुख्यमंत्री म्हणून बोलत नाही तर सातारकर म्हणून बोलत आहे. सातारा हा एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला होता. पण आता वेगळी ‘काँग्रेस’ असल्याचे सांगत त्यांनी नाव न घेता भाजपला टोला लगावला.
नाव गेले की परत येत नाही. ते कमवायला फार कष्ट घ्यावे लागतात. तुम्ही मिळकत, संपत्ती, पैसा किती कमावली यापेक्षा माणसं किती कमावली. माणसांचे प्रेम किती कमावले हे महत्त्वाचं आहे. पण नुकत्याच झालेल्या येथील निवडणुकीत तुम्ही ते घालवलं. सातारच्या राजकीय परंपरेमध्ये खालच्या पातळीवरचे राजकारण केले. जिल्हा परिषदेचा अध्यक्ष कोणी होऊ द्यात, पण लोकांच्या मनातला जिल्हा परिषदेचा अध्यक्ष हा शिवसेनेचाच आहे, असे शिंदे यांनी सांगितले.
हे सातारकर सहन करणार नाहीत. मी पण सातारकर आहे. रोखठोक आहे. एक तर मी कोणाच्या वाटेला जात नाही, पण कोणी छेडलं तर त्याला सोडायचं नाही हे माझे तत्त्व असल्याचेही त्यांनी सुनावले.
सगळीकडे शिवसेनेची विजयी घोडदौड सुरू आहे. मी लोकांमध्ये आजही आहे. घरात बसून पक्ष चालत नाही. मुख्यमंत्री पदाच्या अडीच वर्षाच्या काळात ५६७ सर्वाधिक निर्णय घेतले. कोयना खोऱ्यात स्वप्नवत वाटेल असे पर्यटन आणि विकासाची गंगा उभी केली. शिवसेना हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. कोणालाही घाबरू नका. पक्ष मोठा करण्याचं काम करा. गाव तिथे शिवसैनिक अभियान सुरू करा, असे आवाहन शिंदे यांनी केले.
यावेळी उदय सामंत यांनी साताऱ्याचे ‘आयटी पार्क’ पुढच्या पंधरा दिवसांमध्ये मंजूर होईल. त्यामुळे येथे रोजगाराची संधी प्राप्त होईल. फलटणची ‘एमआयडीसी’ मंजूर करण्यात येत असल्याचे या वेळी त्यांनी सांगितले.
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी जिल्ह्यात शिवसेना वाढविण्यात यशस्वी प्रयत्न केल्याचे सांगितले. पालिका, जिल्हा परिषद निवडणुका महायुतीतून लढण्याचा प्रयत्न केला. मात्र आम्हाला टाळण्यात आले. आम्ही कृष्णा खोरेची रखडलेली कामे मार्गी लावली. पुनर्वसनाच्या प्रश्नांना गती दिली आहे. जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून महायुतीतील प्रत्येक घटक पक्षातील सदस्याला प्रामाणिकपणे निधी दिला आहे. या सभेला शिवसैनिक आणि सातारकर नागरिकांनी गर्दी केली होती.
