कोल्हापूर :  एकनाथ शिंदे शिवसेनेने आरोग्य विभागातील भ्रष्ट अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी मंगळवारी मागणी लावून धरल्यावर महानगरपालिकेच्या सुस्त यंत्रणेचे डोळे अचानक उघडले. घनकचरा प्रक्रीया प्रकल्पावरील लोखंडी भंगार चोरी प्रकरणी ठोक मानधनावरील आरोग्य निरीक्षक सुशांत मुरलीधर कवडे तसेच मुकादम दादासो जयवंत लोंढे याला महापालिकेच्या सेवेतून निलंबित करण्याची कारवाई प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांना करणे भाग पडले. मुख्य आरोग्य निरीक्षक डॉ.विजय पाटील यांच्यावर शिवबसेनेचा रोख असताना त्यानच्यावर कारवाई करण्याबाबत मंजुलक्ष्मी यांनी कानाडोळा केल्याचे दिसून आले.कोल्हापूर महापालिकेतील भ्रष्ट आरोग्य निरीक्षक तथा पशुवैद्यकीय अधिकाऱ्यास सेवेतून बडतर्फ करा करावे, अशी मागणी एकनाथ शिंदे शिवसेनेच्या वतीने मंगळवारी आयुक्तांकडे करण्यात आली.यावेळी शिवसेनेच्या शिष्ठमंडळाने आरोग्य निरीक्षक विजय पाटील यांच्या गैरकारभाराचा पाढाच आयुक्त के.मंजुलक्ष्मी यांच्यासमोर वाचला. यासह नागरिकांच्या होणाऱ्या लुटीचे पुरावे सादर केले.

शिवसेनेने सादर केलेल्या निवेदनामध्ये, महानगरपालिका प्रशासनाच्या सेवेत आरोग्य निरीक्षक पदावर कार्यरत असणारे विजय पाटील हे पशुवैद्यकीय अधिकारी असून, त्यांची आरोग्य निरीक्षक पदी नियुक्ती हे मोठे गौडबंगाल आहे. वास्तविक सदर बझार येथी महानगरपालिका बायोगॅस प्रकल्पाच्या देखरेखी करिता त्यांची नियुक्ती महानगरपालिका प्रशासनाने केली होती. सदर नियुक्तीमध्ये सदर बझार बायोगॅस प्रकल्प अस्तित्वात असे पर्यंतच ही नियुक्ती राहणार असल्याचे स्पष्ट नमूद केले आहे. सद्या सदर प्रकल्प गेल्या काही वर्षापूर्वीच बंद केला असताना विजय पाटील यांची सेवा समाप्त होणे क्रमप्राप्त होते. परंतु संगनमताने त्यांना आरोग्य निरीक्षक पदावर कार्यरत ठेवण्यात आले असून, ही प्रशासनाची घोर फसवणूक आहे, असा आरोप यावेळी करण्यात आला.कसबा बावडा येथील कचरा प्रक्रिया प्रकल्पाच्या आवारातील भंगार चोरी प्रकरणाची महानगरपालिका प्रशासनाने चौकशी पूर्ण केली आहे. त्यात आरोग्य निरीक्षक विजय पाटील व मुकादम दोषी आढळून आले आहेत. यामध्ये संगमताने गायब झालेले भंगार रेकोर्डवर कमी दाखविण्यात आले असून, सुमारे ६० ते ७० लाखांचा हा घोटाळा केल्याचे पुरावे आहेत. यातील दोषींवर तात्काळ फौजदारी गुन्हा नोंद करण्यात यावा.

शहरात जवळपास २५० ते ३०० हॉटेल्स असून, या हॉटेल्समधील कचरा गोळा करण्यासाठी आरोग्य निरीक्षकांच्या मर्जीतील खाजगी ठेकेदाराला ठेका देण्यात आला आहे. महानगरपालिकेची कचरा उठावाची मासिक फी नाममात्र असताना महानगरपालिका प्रशासनाची वाहने, इंधन आदींचा वापर करून अवैद्यरित्या कचरा उठाव केला जात आहे. यासाठी नाममात्र फी ऐवजी रु.२५०० ते रु.५००० रक्कम हॉटेल व्यावसायिकांकडून आकारली जात आहे. यातून हॉटेल व्यावसायिकांची लुट केली जात आहेच त्याचबरोबर महानगरपालिकेची फसवणूक केली जात आहे. त्यामुळे याची तात्काळ चौकशी होवून यातील दोषींवर तात्काळ फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा.त्याचबरोबर शहरात घंटागाडी, हातगाडी द्वारे कचरा उठाव करण्याचा ठेका अवनी संस्थेला दिला गेला आहे. याकरिता सदर संस्थेने स्वत:ची वाहने, कर्मचारी आदींद्वारे हे काम करणे अपेक्षित असताना याकरिताही महानगरपालिकेची वाहने, इंधन, मनुष्यबळ अवैद्यरीत्या वापरले जात आहे. म्हणजे वाहन, कर्मचारी, इंधन महानगरपालिकेचे पण पैसे अवनी संस्थेला अशा प्रकारे गेल्या काही वर्षात महानगरपालिकेची लुट केली जात आहे, असाही आरोप यावेळी करण्यात आला.  

कत्तलखाण्याच्या प्रश्नाबाबत राष्ट्रीय हरित लवादाकडे खटला दाखल करण्यात आला होता. यामध्ये कोल्हापूर महानगरपालिका अंतर्गत पशुवैद्यकीय अधिकारी विजय पाटील यांना दोषी ठरवून रु.१ कोटी ८५ लाख दंड वसूल करण्याचे आदेश दिले होते. सदर दंड पशुवैद्यकीय अधिकारी विजय पाटील यांच्या मालमत्तेतून वसूल करण्याचे आदेश दिले असताना, सदर अधिकाऱ्यांनी संगनमताने सर्व दंड महानगरपालिकेच्या तिजोरीतून भरलेला आहे. यातून महानगरपालिकेची आर्थिक लुट करण्यात आली असून, याची सखोल चौकशी करून यामध्ये सामील सर्व अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हा नोंद करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली.कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीने शहरात ३ बायोगॅस प्रकल्प तयार करण्यात आले. याकरिता कोट्यावधी रुपयांचा निधी खर्च करण्यात आला. यातील २ प्रकल्प बंद अवस्थेत आहेत. १ प्रकल्प सुरु असून यातून निर्माण होणारा बायोगॅस वीज निर्मितीसाठी महावितरणला देण्याची तरतूद करण्यात आली आहे. याद्वारे महानगरपालिकेचे आर्थिक उत्पन वाढविण्याचे स्त्रोत्र असताना निर्माण झालेला बायोगॅस विनावापर सोडला जात आहे. याचा महानगरपालिकेस आर्थिक फटका बसत आहे. महानगरपालिका अंतर्गत विविध विभागात कीटकनाशक फवारणी, दवाखाने, झूम प्रकल्प या ठिकाणी कंत्राटी कर्मचारी कार्यरत असून, सदर कर्मचारी पुरविण्याचा ठेका रीतसर न देता संगनमताने आर्थिक हित जोपासून सदर कर्मचारी पुरवठा केला जात आहे. यातून कर्मचाऱ्यांची पिळवणूक, आर्थिक लुट आणि महानगरपालिकेची फसवणूक केली जात आहे. त्यामुळे तात्काळ हा प्रकार बंद करून रीतसर कायदेशीर पद्धतीने कंत्राटी कर्मचारी भरण्याची कार्यवाही करण्यात यावी. 

करोना काळात आरोग्य निरीक्षक विजय पाटील यांनी बोगस वैद्यकीय प्रमाणपत्र तयार करून स्वत:च्या सही शिक्यानिशी वितरीत केली आहेत. याबाबतचा खटला आयुक्त, अन्न, औषध विभाग, पुणे यांच्याकडे सुरु आहे. या घोटाळ्याचे मुख्य सूत्रधार आरोग्य निरीक्षक विजय पाटील असून, त्यांच्यावर तात्काळ महानगरपालिका प्रशासनाने कारवाई करणे गरजेचे आहे. या सर्व घोटाळ्यांची तात्काळ चौकशी करून दोषी असलेल्या आरोग्य निरीक्षक विजय पाटील व संबधित अधिकारी यांच्यावर तात्काळ फौजदारी गुन्हा दाखल करून त्यांना सेवेतून कायमस्वरूपी बडतर्फ करण्याची कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही यावेळी केली.

यावेळी आयुक्त के.मंजुलक्ष्मी यांनी सदर सर्व प्रकरणांची तात्काळ चौकशी करून कायदेशीर कारवाई करण्याची ग्वाही शिवसेनेच्या शिष्ठमंडळास दिली.यावेळी शिवसेना शहरप्रमुख रणजीत जाधव, उपजिल्हाप्रमुख उदय भोसले, किशोर घाटगे, रणजीत मंडलिक, शहर समन्वयक सुनील जाधव, कमलाकर जगदाळे, गणेश रांगणेकर, कपिल नाळे, अमर क्षीरसागर, श्रीकांत मंडलिक, कपिल सरनाईक, कृष्णा लोंढे, मंदार तपकिरे, क्रांतीकुमार पाटील, अमृत परमणे आदी उपस्थित होते.