सांगली : प्रचार सभांसाठी नेत्यांची धावपळ, उमेदवारांची मतदार भेटीसाठी सुरू असलेली धांदल, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीसांची तारांबळ आणि मतदान प्रक्रिया शांततेत व व्यवस्थित पार पाडण्यासाठी प्रशासनाची कसरत यात गुरूवारी जिल्हा परिषद व प्रचाराचा धुरळा शांत झाला. जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या ६१ गटामध्ये आणि दहा पंचायत समितीच्या १२२ गणामध्ये शनिवारी मतदान होत आहे.

गेले पंधरा दिवस ग्रामीण भागात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचा प्रचार जोरात सुरू होता. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर दोन दिवस प्रचारात शिथिलता आली होती. मात्र, दोन दिवस मतदान आणि मतमोजणी प्रक्रिया निवडणूक आयोगाने पुढे ढकलल्याने प्रचारासाठी अतिरिक्त दोन दिवसांचा अवधी मिळाला. गुरूवारी रात्री दहा वाजता जाहीर प्रचाराची सांगता झाली असून यानंतर खर्‍या अर्थाने एकगठ्ठा मतदानासाठी गावकी, भावकीच्या बैठका, कुठे बेलभंडारा उचलून आणाभाका घेण्याचे प्रकारही घडतील. याचबरोबर काही ठिकाणी लक्ष्मी दर्शनाची व्यवस्थाही केली जाण्याची चिन्हे आहेत.

प्रचाराच्या अंतिम दिवशी पालकमंत्री चंद्रकांत पाटील, खासदार विशाल पाटील, आमदार सुरेश खाडे, आ. जयंत पाटील, आमदार विश्‍वजित कदम, आ. रोहित पाटील, आमदार सुहास बाबर, आ. गोपीचंद पडळकर यांनी जाहीर सभा घेउन मतदारांना मतदानाचे आवाहन तर केलेच पण याचबरोबर उमेदवारांनी दुचाकी फेरी काढून मतदानासाठी वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न केला.

पालकमंत्री पाटील यांनी आज सकाळी नउ वाजल्यापासून जत तालुक्यातील निवडणुकीच्या प्रचारासाठी सभा घेतल्या. शेगाव, बनाळी, माडग्याळ, संख याठिकाणी झालेल्या प्रचार सभेत त्यांनी भाजपला विजयी करण्याचे आवाहन केले. तर आ. जयंत पाटील यांनी दिवसभर मतदार संघातील निवडणुकीचा कानोसा घेउन सायंकाळी पेठ, कामेरी, येलूर, कोरेगाव, शिगाव व बागणी या ठिकाणी जाहीर सभा घेतल्या. आ. डॉ. कदम यांनी कडेगाव व पलूस तालुक्यातील आठ जिल्हा परिषद गटामध्ये मतदारांची धावती भेट घेत प्रचाराची सांगता केली.

जिल्हा परिषद निवडणुकीत 61 पैकी भाजप ५० जागा लढवत असून अन्य पक्षाकडून लढविल्या जात असलेल्या जागा अशा काँग्र्रेस २५, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट ३१, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट ३२, शिवसेना शिंदे गट ३२, जनसुराज्य शक्ती ६, रयत क्रांती संघटना १, शिवसेना ठाकरे गट १ जागा लढवत आहे. जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद महिला राखीव असल्याने निंबवडे (आटपाडी), येलूर (वाळवा), सलगरे (मिरज), कुंडल (पलूस) या ठिकाणच्या लढती अधिक लक्ष्यवेधी बनल्या आहेत.

मतदान शांततेत पार पडावे यासाठी निंबवडे (ता. आटपाडी) या ठिकाणी पोलीसांची गस्त वाढविण्यात आली आहे. तर कवठेमहांकाळ पोलीस ठाण्याचे प्रभारी प्रवीणकुमार कांबळे यांच्या नेतृत्वाखाली सलगरे या गावी पथसंचलन करून मतदारामध्ये विश्‍वास निर्माण करण्याचा प्रयत्न केला.