इचलकरंजी नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत राष्ट्रवादीपाठोपाठ काँग्रेसनेही विजयाचे खाते उघडले आहे. प्रभाग १९ मधून भाजपाच्या उमेदवार सौ. सीमा बबन कांबळे यांनी माघार घेतल्याने राष्ट्रीय काँग्रेसच्या उमेदवार सौ. ध्रुवती दळवाई यांची बिनविरोध निवड झाली आहे. तर भारतीय जनता पार्टीवर सलग दोन धक्के पचवण्याची वेळ आली आहे. इचलकरंजी नगरपालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच दोन बिनविरोध निवडी झाल्याने या निवडणुकीला महत्त्व आले आहे. दरम्यान, शुक्रवारी, अर्ज माघारीच्या दुसऱ्या दिवशीही कांबळे यांच्याबरोबरच प्रभाग २ मधून चंद्रकांत जालंदर कांबळे व प्रभाग ११ मधून अपक्ष राजेंद्रप्रसाद मदनलाल बोहरा यांनी अर्ज मागे घेतल्याने दोन दिवसात पाच जणांची माघार झाली आहे.
इचलकरंजी नगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीत प्रारंभापासून धक्क्यावर धक्के बसू लागले आहेत. अर्ज माघारीच्या दुसऱ्या दिवशी राष्ट्रीय काँग्रेसने बिनविरोध विजयाचे खाते उघडले आहे. प्रभाग १९ मधून राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार सौ. ध्रुवती सदानंद दळवाई यांच्या विरोधात कोणीच उमेदवार उरला नसल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली आहे. दळवाई यांच्या विरोधातील भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत उमेदवार सौ. सीमा कांबळे यांनी माघार घेतली आहे.
प्रभाग १९ मध्ये बिनविरोध निवडीसाठी प्रारंभापासूनच तडजोडीचे प्रयत्न सुरू होते. अखेर आज त्याला यश येऊन सौ. कांबळे यांनी आपला उमेदवारी अर्ज माघार घेतल्याने सौ. दळवाई यांना कोणीच विरोधक उरलेला नाही. त्यामुळे दळवाई यांच्या बिनविरोध निवडीची आता केवळ औपचारिकता बाकी आहे. बिनविरोध निवडीनंतर दळवाई समर्थकांनी गुलालाची उधळण आणि फटाक्यांची आतषबाजी करीत जल्लोष साजरा केला. तर शहर काँग्रेस भवन येथे माजी आमदार प्रकाश आवाडे यांच्या हस्ते सौ. दळवाई आणि गबान यांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी शहर काँग्रेसचे अध्यक्ष प्रकाश मोरे, सतीश डाळ्या, सुनील पाटील आदी उपस्थित होते.
