कोल्हापूर : राज्यातील यंत्रमागाच्या वीज थकबाकीतील रक्कम हप्त्यामध्ये भरावी, यासाठी ऑनलाइन अर्ज सुरू करावेत, अशा सूचना ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

 मागील काही वर्षांपासून अडचणीतून मार्गक्रमण करणारा यंत्रमाग उद्योग करोना महामारीमुळे आणखीनच अडचणीत आला. करोनात यंत्रमाग उद्योगाची वीज बिले थकबाकीत गेली. महावितरणकडून थकीत वीज बिलासाठी हप्ते करून देण्यात आले होते. या योजनेची मुदत मार्च महिन्यात संपली. करोनाच्या दुसऱ्या लाटेच्या टाळेबंदीमुळे पुन्हा यंत्रमाग उद्योजक अडचणीत आले. त्यांना वीज बिले भरता आली नाहीत. यासंदर्भात आमदार प्रकाश आवाडे यांनी ऊर्जामंत्री राऊत यांची भेट घेऊन परिस्थितीची विस्तृत माहिती देत सवलत सुरू ठेवण्याची मागणी केली. मंत्री राऊत यांनी तशा सूचना महावितरणच्या अधिकाऱ्यांना केल्या आहेत. ‘महावितरणने थकीत वीज बिलातील ३० टक्के अधिक २ टक्के भरून उर्वरित रकमेचे ६ हप्त्याची योजना पुन्हा सुरू केली. याचा लाभ यंत्रमागधारकांनी घ्यावा’, असे आवाहन इचलकरंजी पॉवरलूम असोसिएशनचे अध्यक्ष सतीश कोष्टी यांनी केले आहे.