दयानंद लिपारे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कोल्हापूर : माजी वस्त्रोद्योगमंत्री प्रकाश आवाडे यांचा भाजपप्रवेश कधी होणार या उत्तराची प्रतीक्षा आहे. याआधीच त्यांच्या स्नुषा वैशाली स्वप्निल आवाडे यांनी मात्र थेट संघ परिवारात स्थान मिळवले आहे. महाराष्ट्र राज्य नागरी सहकारी बँक महासंघाच्या निवडणुकीत वैशाली आवाडे या सहकार भारती आघाडीतून सर्वाधिक मते घेऊन विजयी झाल्या आहेत.

   काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष असतानाच प्रकाश आवाडे यांनी पक्षाचा राजीनामा दिला. ताराराणी आघाडीच्या माध्यमातून इचलकरंजी विधानसभा निवडणूक लढवून विजय मिळवला. त्यानंतर त्यांनी लगेचच माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासमवेत भाजपला पाठिंबा पत्र सादर केले. राज्यात शिंदे यांच्या बंडखोरीनंतर सत्तांतर घडून आले. मधल्या काळात आवाडे यांनी भाजपची साथ कायम ठेवली. गेले वर्षभर त्यांच्या प्रत्येक कार्यक्रमात भाजप, नरेंद्र मोदी यांचा नामोल्लेख होत असतो. इचलकरंजी महापालिकेची पहिली आगामी निवडणूक भाजपच्या वतीने लढण्याचा इरादाही त्यांनी व्यक्त केला आहे, तर पुत्र राहुल आवाडे यांना भाजपकडून लोकसभेची उमेदवारी मिळावी यासाठीही त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. तथापि इचलकरंजीतील भाजपचे माजी आमदार सुरेश हाळवणरकर यांच्या भूमिकेवर त्यांच्या भाजपप्रवेशाचे समीकरण अवलंबून आहे.

भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या आवाडे यांना प्रतीक्षा असताना त्यांच्या सूनबाईंनी पुढचे पाऊल टाकत थेट संघ परिवारात प्रवेश केला आहे. राज्यातील सहकारी बँकांचा महासंघ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाराष्ट्र नागरी सहकारी बँक फेडरेशनची निवडणूक २१ जागांसाठी होऊन ‘सहकार भारती’ने १२ जागांवर बिनविरोध विजय मिळवला. ९ जागांसाठी झालेल्या मतदानात ‘सहकार भारती’कडून महिला गटातून निवडणूक लढवणाऱ्या वैशाली स्वप्निल आवाडे यांना सर्वाधिक मते मिळाली. सहकार भारतीने १५ जागांच्या आधारे सत्ता राखली.

सहकार भारतीला अपेक्षा

संघ परिवाराशी संबंधित ‘सहकार भारती’मध्ये आवाडे यांचा प्रवेश कसा झाला, याचीही चर्चा होत आहे. सहकार भारतीचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून रिझव्‍‌र्ह बँकेचे संचालक सतीश मराठे यांच्याकडे पाहिले जाते. त्यांचा राज्यातील बँकांच्या सहकारी बँकांच्या नेतृत्व, अध्यक्षांशी वारंवार संपर्क येतो. त्यातून त्यांनी पश्चिम महाराष्ट्रातून निपुण कोरे, सतीश पाटील, वैशाली आवाडे यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगण्यात येते. त्यांनी कोल्हापूर जिल्ह्याचे सहकार भारतीचे अध्यक्ष, आर्य चाणक्य नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष, विश्व हिंदू परिषदेचे सरचिटणीस जवाहर छाबडा यांच्या माध्यमातून आवाडे यांची चाचपणी केली होती. छाबडा-आवाडे यांच्यात उमेदवारीबाबत चर्चा झाली. ऐन वेळी उमेदवारी बदलली तर जाणार नाही ना, अशी साशंकता आवाडे यांना होती. सहकार भारतीच्या कामकाजात राजकीय हस्तक्षेप नसतो असा निर्वाळा देण्यात आल्यानंतर त्यांनी उमेदवारी स्वीकारली आणि या निवडणुकीत सहकार भारतीच्या आपलीही यंत्रणा राबवून वैशाली आवाडे यांना सर्वाधिक मते मिळवली. कल्लाप्पांना आवाडे इचलकरंजी जनता सहकारी बँकेचे संचालक स्वप्निल आवाडे यांच्या वैशाली आवाडे या पत्नी आहेत. त्यांचे महिला संघटनाचे काम उल्लेखनीय आहे. आता त्या बँक फेडरेशनच्या संचालिका झाल्यानंतर त्यांच्याकडून ग्रामीण, शेतकरी, बचत गट याबाबतचे काम सहकार भारतीला अपेक्षित आहे. 

Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ex minister of textiles prakash awade bjp entry stay chance for snusha vaishali swapnil awade ysh
First published on: 08-12-2022 at 00:02 IST