|| दयानंद लिपारे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना भरीव मदतीची अपेक्षा

कोल्हापूर : पावसाच्या सततच्या तडाख्याने कोल्हापूर जिल्ह्यातील शेतीला मोठा तडाखा बसला आहे. अस्मानी संकटामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. महापूर, परतीचा पाऊस आणि आता चक्रीवादळामुळे आलेला पाऊस अशा पावसाच्या तीन मोठ्या दणक्यांमुळे उभे पीक आडवे झाले आहे. अलीकडे झालेल्या पावसामुळे जिल्ह्यात हजाराहून अधिक हेक्टर भात, नाचणी, आंबा पिकाचे नुकसान झाले आहे. महापुरातील पावसामुळे झालेली नुकसानभरपाई मिळण्यास विलंब झाला होता. हा अनुभव पाहता या ताज्या नुकसानीचे पंचनामे होऊन भरपाई कधी मिळणार, असा प्रश्न शेतकऱ्यांना सतावू लागला आहे.

या वर्षी पावसाने कोल्हापूर जिल्ह्याला झोडपून काढण्याचा जणू चंग बांधला आहे असे दिसत आहे. जुलैमध्ये अवघ्या तीन दिवसांत विक्रमी पाऊस झाल्याने नदी, धरणांची पाणी पातळी विक्रमी वाढली. महापुराच्या या आपत्तीचा जोरदार फटका शेतीला बसला. जिल्ह्यातील ऊस, भात, नाचणी, सोयाबीन ही पिके दीर्घकाळ पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांनी डोक्याला हात लावला. त्यातून सावरत असताना परतीच्या पावसाचा जबरदस्त तडाखा बसला. दिवाळीनंतर हिवाळा सुरू झाल्यानंतर उगवलेले पिकाचे धान्य घरी नेण्याची लगबग सुरू असताना पुन्हा एकदा आठवड्याभरात तीन-चार वेळा झालेल्या संततधार पावसामुळे पिकांनी पुन्हा मान टाकली.

जुलैतील हाहाकार

जुलै महिन्यातील महापुरामुळे शेतकऱ्यांना मोठ्या संकटाला तोंड द्यावे लागले. सन २०१९ मधील महापुराच्या भयाण दिव्यातून सावरत असताना नव्या महापुराच्या संकटाने तो खचला. जुलैतील पावसाने कोल्हापूर जिल्ह्यातील ७३ हजार ९२८ हेक्टर पीक पाण्यात गेले. त्यामध्ये जवळपास ६० हजार हेक्टर ऊस पिकाचा समावेश होता. खेरीज भात, सोयाबीन, भुईमूग, नाचणी ही पिके हातातून निसटल्याने शेतकरी हिरमुसला. आर्थिक मदत मिळण्यावरून आंदोलने झाली.

जिल्ह्यातील शेत पिकाच्या नुकसानीसाठी १०५ कोटींची मागणी करण्यात आली होती. दिवाळीपर्यंत ८६ कोटी रुपयांचे वितरण झाले होते. ९० टक्क्यांहून अधिक शेतकऱ्यांना नुकसानभरपाईची रक्कम वाटण्यात आली असल्याचा दावा शासकीय यंत्रणेकडून केला जात आहे. परतीच्या पावसानेही दिवाळीच्या अगोदर शेतकऱ्यांना हैराण केले होते. महापूर, अवकाळी ही दोन्ही संकटे सरतात न सरतात तोवर डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात पावसाने जोरदार हजेरी लावली. उरल्यासुरल्या पिकांना धोका उत्पन्न झाला.

जिल्ह्यातील ऊस तोडणी थांबवणे भाग पडले. शिवारात पालात राहणारा ऊस तोडणी कामगार बेहाल झाले. ऊस तोडणी खोळंबली. अर्धवट तोडणी झालेला ऊस बाहेर काढताना शेतकऱ्यांना एकच कसरत करावी लागली. परिणामी उसाचे गाळपही थंडावले. अलीकडे झालेल्या पावसामुळे जिल्ह्यात सुमारे एक हजार हेक्टर पिकाचे नुकसान झाले आहे. उशिरा लागण केलेल्या भात, नाचणी या पिकांचा प्रामुख्याने समावेश आहे. त्यांचे सुमारे ३० टक्केपेक्षा अधिक नुकसान होईल असा अंदाज आहे. बांधावरील तीन हजार हेक्टर आंबा पिकाचा मोहर गळाला असल्याने २० टक्के घट होणार आहे.

दुसरा, तिसरा मोहर आल्यानंतर काहीसे आशादायक वातावरण निर्माण होईल. प्राथमिक नजरअंदाजानुसार साडेसात हजार हेक्टरचे नुकसान झाले होते. सुधारित माहितीनुसार एक हजार हेक्टर पिकांचे नुकसान झाले आहे. पंचनाम्याचे काम सुरू झाले आहे. निकषानुसार नुकसानभरपाई मिळेल असे जिल्हा कृषी अधीक्षक ज्ञानदेव वाकुरे यांनी  सांगितले.

शासकीय मदत तत्परतेने

अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले असले तरी त्यांना शासकीय मदत तत्परतेने देण्याचा प्रयत्न राहील, असे ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी म्हटले आहे. डिसेंबर महिन्यात थंडीऐवजी अवकाळीच्या दणक्याने फळ, भाजीपाला या पिकांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. उसाला अधिक फटका बसेल असे वाटत नाही. ऊसतोड कामगारांची दुर्दशा झाली. त्यांच्यासह शेतकऱ्यांना नुकसानभरपाई लवकर मिळण्यासाठी पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहते, असे मुश्रीफ यांनी सांगितले.

नुकसानभरपाईची मागणी … पावसाच्या अस्मानी संकटामुळे शेतकऱ्यांचा धीर खचला आहे. त्यांच्याकडून तातडीने शासकीय मदत मिळण्याची मागणी होत आहे. शेतकरी संघटनांनी हा मुद्दा उचलून धरला आहे. कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील पीक स्थितीची पाहणी केल्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी कोल्हापूर जिल्ह्यात ऊस, भात आणि सांगली जिल्ह्यात द्राक्ष पिकाची अतोनात हानी झाली आहे. गतवेळीप्रमाणे विलंब न करता तात्काळ या शेतकऱ्यांना नुकसानीच्या प्रमाणात रास्त भरपाई मिळाली पाहिजे, अशी मागणी केली आहे.

Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Expect huge help to farmers in kolhapur district rain damage to agriculture akp
First published on: 07-12-2021 at 21:09 IST