शिरोळ तालुक्यातील पंचगंगा नदीवरील पाटबंधारा विभागाने पाणी उपसाबंदी उठवूनही विद्युत मंडळाने विद्युतपुरवठा चालू न केल्याने संतप्त शेतकऱ्यांनी महावितरण कंपनीच्या कुरुंदवाड येथील उपविभागीय कार्यालयावर मोर्चा काढला. विभागीय कार्यालयात जबाबदार अधिकारीच नसल्याने आंदोलनकर्त्यांनी कार्यालयातील कर्मचाऱ्यांना बाहेर काढून टाळे ठोकत ठिय्या आंदोलन केले. सहायक अभियंता शशिकांत टंकसाळी यांना आंदोलनकर्त्यांनी घेराव घालून धारेवर धरले. विद्युतपुरवठा चालू केल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
पाणी उपसाबंदी उठविली असतानाही कुरुंदवाड महावितरण कंपनीने विद्युतपुरवठा चालू न केल्याने संतप्त शेतकऱ्यांनी स्वाभिमानीच्या नेतृत्वाखाली कुरुंदवाड विद्युत मंडळ कार्यालयावर मोर्चा काढला. यामध्ये सुमारे दीडशेहून अधिक शेतकरी सहभागी झाले होते.
कार्यालयात सहायक अभियंता टंकसाळी नसल्याने आंदोलनकर्त्यांनी कार्यालयातील इतर कर्मचारी व अधिकाऱ्यांना बाहेर काढून टाळे ठोकले व अधिकारी येईपर्यंत येथून हलणार नाही, अशी भूमिका घेऊन कार्यालयासमोरच ठिय्या मारून बसले. आंदोलनात स्वाभिमानी संघटनेचे शिरोळ तालुकाध्यक्ष बंडू पाटील, विश्वास बालिघाटे, बाळासाहेब माळी, सातेंद्र खुरपे, यशवंत चंदुरे, यांच्यासह हेरवाड, तेरवाड, शिरढोण आदी गावांतील शेतकरी मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते.