कोल्हापूर : शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करण्याकरिता केंद्र सरकार आणि राज्य सरकारने सध्या नुरा कुस्ती सुरू ठेवली आहे. गल्ली ते दिल्लीपर्यंत भोंगा, हनुमान चालिसा, हिजाब या प्रश्नांत लोकांना गुंतवून ठेवले आहे. त्यातून यामध्ये शेतकऱ्यांचे सर्व प्रश्न जाणीवपूर्वक प्रलंबित ठेवले आहेत, अशी टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी मंगळवारी केली.
चंदगड तालुक्यातील तुडये, ढोलगरवाडी येथे शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी मार्गदर्शन करताना शेट्टी यांनी केंद्र व राज्य शासनावर टीकेची तोफ डागली. ते म्हणाले, जलविद्युत प्रकल्पांसाठी शेतकऱ्यांच्या जमिनीचे संपादन करण्यात येते. वीजनिर्मितीसाठी खरे योगदान शेतकऱ्यांचे असतानाही त्यांना त्रासदायक ठरणारा रात्रीचा वीजपुरवठा केला जातो. शेतकऱ्यांना दिवसा दहा तास वीजपुरवठा करावा यासाठी न्यायालयात याचिका दाखल केली जाणार आहे. आपला हक्क मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनीही प्रयत्नशील राहिले पाहिजे. याकरिता प्रत्येक ग्रामपंचायतीने आगामी ग्रामसभेत ठराव करून त्याच्या प्रती स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडे पाठवाव्यात, असे आवाहन त्यांनी केले.
मेळाव्यात एच. पी. पाटील, माजी सभापती जगन्नाथ हुलजी, अशोक मोहिते, बळिराम फडके, संघटनेचे राज्य सचिव राजेंद्र गड्डय़ांनावर, हर्षवर्धन कोळसेकर, श्रीमती मिसाळे, आर. के. पाटील यांची भाषणे झाली. शिवाजी कांबळे यांनी आभार मानले.