सांगली/कोल्हापूर/वर्धा : शक्तिपीठ महामार्गाच्या रेट्यात पिढीजात जपलेली, जोपासलेली बागायती शेती संपादित होण्याच्या भीतीने शेतकरी वर्ग या महामार्गाला विरोध करत आहे. मात्र, हा विरोध केवळ ‘बाधित’ शेतकऱ्यांपुरता मर्यादित नाही. उंची, काँक्रीटीकरण यामुळे पावसाळ्यात महामार्गावरील पाणी वाहून लगतच्या शेतांमध्ये शिरण्याची भीतीही विरोधाचे कारण आहे. दरवर्षी पुराला तोंड देणाऱ्या पश्चिम महाराष्ट्रात पाणी साचण्याच्या समस्येमुळे शेतजमिनी नापीक होण्याची भीती आहे. पण विदर्भातील शेतकऱ्यांनाही समृद्धी महामार्गानंतर अशा समस्येला तोंड द्यावे लागत असल्याकारणाने तेही शक्तिपीठ महामार्गामुळे चिंतेत आहेत. मुळात सांगली, कोल्हापूर या भागाची कृष्णा खोऱ्यातील भूस्थिती बशीसारखी म्हणजेच बेसिनसारखी आहे. यामुळे महापुराच्या काळात पाण्याचा निचरा जलदगतीने होत नाही, याच वेळी सह्याद्रीच्या डोंगररांगांतून वेगाने पाणी आणणाऱ्या कृष्णा, वारणा, पंचगंगा या नद्यांचे पाणी आजूबाजूच्या शेतात पसरते. २०१९ मध्ये आलेल्या महापुराचे पाणी पाऊस थांबला तरी कमी होत नव्हते. पात्रातील पाणी वाढ तासाला फुटांने होते, तर उतार मात्र, इंचांने होतो. यामुळे पाणी आजूबाजूच्या शेतात पसरते. १०-१५ दिवस पाणी शेतातील पिकात राहिल्याने उसाबरोबरच अन्य पिकेही पाण्याखाली जातात. सलग ८-१० दिवस पीक पाण्याखाली राहिले तर कुजते. हाच धोका शक्तिपीठ महामार्गामुळे वाढणार आहे.

महामार्गाची उंची अनेक भागांत जमिनीपासून १५ फुटांपर्यंत राहण्याची शक्यता आहे. परिणामी महामार्गात येणारे नैसर्गिक जलप्रवाह, ओढे यांचे मार्ग बदलतील. सांगलीजवळील कवलापूर गावातील १५० एकर जमीन या महामार्गासाठी अधिग्रहीत करण्याचे नियोजन आहे. या प्रस्तावित महामार्गालगत १०० फुटांहूनही अधिक खोलीची काळ्या मातीची करलाट जमीन आहे. महामार्गाचे पाणी या शेतांत वाहून आल्यास जमिनीत ते साठून राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे पीक घेणेही कठीण होईल, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. महामार्गाच्या कामादरम्यान निर्माण होणाऱ्या धुळीमुळे द्राक्षांच्या पानांची संप्रेरक शक्ती थांबून या पिकावरही परिणाम होईल, अशी भीती आहे.

समृद्धीच्या अनुभवामुळे वर्ध्यातही चिंता

वर्धा जिल्ह्यात समृद्धी महामार्गासाठी जमीन अधिग्रहणाच्या वेळी आलेले वाईट अनुभव डोळ्यापुढे ठेवून शेतकऱ्यांनी शक्तिपीठ मार्गाबाबत सावध भूमिका घेतल्याचे दिसून येते. जिल्ह्यातील वर्धा व सेलू तालुक्यातून नागपूर-गोवा हा शक्तिपीठ महामार्ग पुढे जाणार आहे. नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गात शेती गेलेली अनेक गावे नव्या मार्गातील गावांच्या शेजारी आहेत. समृद्धीचे बांधकाम होत असताना लगतची शेती संकटात सापडली. हाच अनुभव शक्तिपीठ मार्ग देणार का? असा शेतकऱ्यांचा प्रश्न आहे.

● कृष्णा, वारणा, पंचगंगेच्या खोऱ्यात काळी, भुसभुशीत जमीन आहे. तिथे मुरूम लागेपर्यंत खोदायचे म्हटले तरी ३० ते ४० फुटापर्यंत खोदकाम करावे लागेल अशी शक्यता स्थानिक लोक बोलून दाखवतात. परिणामी पूल बांधण्याचा बांधणी आणखी खर्चिक होणार आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या २० वर्षांत बांधलेल्या पुलांच्या धरणसदृष्य भिंतींचा भराव हटवून त्याऐवजी कमानीचा पूल बांधण्याची मागणी होत आहे. त्यासाठी स्थानिकांनी अनेक आंदोलनेही केली आहेत.

साखर उद्याोग गाळात

कोल्हापूर-सांगली हा साखरेचा पट्टा म्हणून ओळखला जातो. येथे उसाचे अनेक मळे आहेत. उसाचे वाढते क्षेत्र लक्षात घेऊन या परिसरातील साखर कारखान्यांनी गाळप क्षमतेमध्ये जवळपास दुप्पट वाढ केलेली आहे. परंतु महापुराच्या तीव्रतेमुळे ऊस पिकांची सुमारे २० टक्के हानी होऊ शकते, असे अनुमान स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी काढले आहे. ही स्थिती पाहता संभाव्य महापूर तीव्रतेमुळे ऊस उत्पादक शेतकरी नव्हे तर साखर उद्याोगाचे अर्थकारणही बिघडणार आहे.

नुकसानकारक पूल

● शक्तिपीठ महामार्गासाठी काही ठिकाणी नद्या किंवा मोठ्या जलप्रवाहांवर पूल उभारावे लागणार आहेत. त्यासाठी होणाऱ्या भरावामुळे नद्यांचे पात्र कमी होण्याची शक्यता आहे. शिवाय या पुलांसाठी धरणसदृश्य भिंती उभारण्यात येत असल्याने पाणी अडून राहण्याचे प्रमाणही वाढणार आहे.

महामार्गाच्या वाटेवर येणाऱ्या गाव-तालुक्यांतील शेतकरी आणि सामान्य नागरिकांच्या मतांनाही या मालिकेतून व्यासपीठ दिले जाणार आहे. तुम्हाला महामार्गाविषयी काय वाटते, तो आवश्यक वाटतो का, शेतीवर काय परिणाम होईल, धार्मिक पर्यटनासाठी तो वरदान आहे का या किंवा अशा अन्य मुद्द्यांवर तुमची मते आम्हाला loksatta@expressindia. com या ईमेलवर कळवा. निवडक, अभ्यासपूर्ण आणि जनभावना व्यक्त करणाऱ्या मतांना लवकरच प्रसिद्धी दिली जाईल.

कृष्णा, वारणा, पंचगंगा नद्यांचा परिसर महापूरप्रवण आहे. शक्तिपीठ प्रकल्प साकारत असताना त्याच्या महापुराची स्थिती नेमकी कशी असेल, याचे नेमके काय परिणाम होऊ शकतात हे समजण्यासाठी नाशिक येथील जलविज्ञान विभागाकडून रितसर परवानगी, ना हरकत दाखला घेणे अत्यंत गरजेचे आहे. शासकीय पातळीवर कसलाही संवाद ठेवला गेलेला नाही.सर्जेराव पाटीलअध्यक्ष, सांगली महापूर नियंत्रण नागरी कृती समिति

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शक्तीपीठ महामार्ग शेती, ग्रामीण भाग, पर्यावरण, अर्थकारण अशा अनेक घटकांना फटका देणारा असणार आहे. कोल्हापूर शहराच्या महापुराच्या तीव्रतेत वाढ होणार हे नि:संशय. एका बाजूला शासन शेतीतून उत्पन्न वाढावे असा प्रयत्न करीत आहे. पण महापुरामुळे शेतीचे उत्पन्न घटणार आहे याचे भान कोणालाच नाही.उदय गायकवाडपर्यावरण अभ्यासक, कोल्हापूर