कोल्हापूर : अमेरिकेत रंगलेल्या फिफा विश्वचषक स्पर्धेच्या स्पेन विरुद्ध गतविजेत्या अर्जेंटिना यांच्यातील अंतिम सामन्याचा थरार जगभरात सुरू असताना फुटबॉल वेड्या कोल्हापूरकरांना रात्रीचा दिवस करत या महामुकाबल्याचा रात्रभर मनसोक्त आनंद घेतला. अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या या अंतिम सामन्यानंतर विजयी संघाच्या समर्थकांनी आनंद व्यक्त केला. परंतु, मोठ्या संख्येने अर्जेंटिनाच्या चाहत्यांना निराशा लपवता आली नाही.
फुटबॉल हा केवळ खेळ नसून कोल्हापूरच्या रोमारोमात भिनलेला श्वास आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले.

राजकीय कार्यालयात फुटबॉल

फिफा विश्वचषक स्पर्धा सुरू होण्यापूर्वी पासूनच कोल्हापुरात या विश्वचषक स्पर्धेचे जल्लोषी वातावरण दिसत होते. अखेरचा सामना असताना अर्जेंटिना आणि स्पेनचे चाहते यांच्यामध्ये कोण जिंकणार यावरून बक्षीसे लावली होती. अर्जेंटिनाचे चाहते अधिक संख्येने होते. अंतिम स्पर्धेची चुरस लक्षात घेऊन शहरात वेगवेगळ्या ठिकाणी मोठे पडदे लावून सामन्याचा आस्वाद घेतला जात होता. भारतीय जनता पक्ष, राष्ट्रीय काँग्रेस यांच्या पक्ष कार्यालयातही मोठे पडदे लावून सामना पाहिला जात होता. पावसाची भरभर सुरू असतानाही चौकाचौकात रेनकोट, छत्री घेऊन चाहते सामना पाण्यामध्ये मग्न झाले होते.

मध्यरात्री उत्साह

सामन्याची मध्यरात्रीची वेळ असूनही तालीम मंडळे, विविध गल्ल्यांमध्ये फुटबॉलप्रेमींनी मोठी गर्दी केली होती. प्रत्येक गोलसाठी होणारा फटका बसला की त्याला दाद दिली जात होती. खेळाडूंच्या प्रत्येक आकर्षक चालीवर चाहत्यांच्या शिगेला पोहोचलेला उत्साह पाहून जणू कोल्हापुरातच प्रत्यक्ष सामना रंगल्याचा भास होत होता.

फुटबॉल प्रेमाची प्रचिती

अंतिम सामना संपताच तरुणाईचा उत्साह दिसून आला. कोल्हापूर, इचलकरंजी या शहरात काही ठिकाणी फटाके लावण्यात आले. फिफा विश्वचषक सोहळा पुन्हा एकदा कोल्हापूरच्या अस्सल क्रीडाप्रेमी संस्कृतीची आणि फुटबॉलवरील अगाध प्रेमाची प्रचिती देऊन गेला.

मेस्सीवर प्रेम कायम

कोल्हापुरात प्रामुख्याने अर्जेंटिना, ब्राझील, पोर्तुगाल, स्पेन या देशातील फुटबॉल संघाचे आणि त्यातील तारांकित खेळाडूंचे आकर्षण आहे. गतविजेता अर्जेंटिना अंतिम सामन्यात पोहोचल्याने अनेक फुटबॉल चाहत्यांनी निळ्या – पांढऱ्या रंगाचे टी-शर्ट घालून हा सामना पाहिला. स्पेनने पहिला गोल नोंदवला असला तरी उपांत्य व उपांत्यपूर्व फेरीत अर्जेंटिनाने पिछाडी भरून काढून सामन्यात विजय मिळवला होता. त्याप्रमाणे लिओनेल मेस्सीचा संघ शेवटच्या टप्प्यात चढाई करून विश्वविजेतेपद पटकावे अशी आशा वाटत होती. परंतु प्रत्यक्षात अर्जेंटिनाला ही कामगिरी करता आली नाही. याबाबत मेस्सी वेडे कोल्हापुरी फॅन क्लबचे सदस्य विनायक पवार यांनी सन २०२२ प्रमाणे अर्जेंटिनाला विजेतेपद मिळेल अशी आशा होती. ती साध्य झाली नाही. परंतु अर्जेंटिना आणि लिओनेल मेस्सी वरील आमचे प्रेम किंचितही कमी झाले नाही. त्यांना सदैव पाठबळ राहील , अशा भावना बोलून दाखवल्या.