बंडखोर आमदारांवर शिवसैनिक चांगलेच संतापले आहेत. बंडखोर आमदारांच्या कार्यालयाची शिवसैनिकांकडून तोडफोड करण्यात येत आहे. जयसिंगपूरमधील बंडखोर आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्याविरुद्ध शिवसैनिक रसत्यावर उतरले आहेत. मात्र, नेमके त्याचवेळेस यड्रावकरांचे समर्थकही तिथे आल्यामुळे यड्रावकर समर्थक आणि शिवसैनिकांमध्ये हाणामारी झाल्याचे दिसून आले.

पोलीस आणि शिवसैनिकांमध्येही झटापट

जयसिंगपूरमध्ये राजेंद्र पाटील-यड्रावकर यांचे समर्थक त्यांना पाठिंबा देण्यासाठी यड्रावकरांच्या कार्यालयाबाहेर एकत्र आले होते. मात्र, शिवसैनिकही नेमके त्याच वेळेस मोर्चा घेऊन यड्रावकरांच्या कार्यालयाजवळ आले. यड्रावकर समर्थक आणि शिवसैनिक आमने-सामने आल्यामुळे दोघांमध्ये हाणामारी झाली. पोलिसांनी मोर्चा अडवल्यानंतर शिवसैनिक आणि पोलिसांमध्येही झटापट झाल्याचे दिसून आले.

जयसिंगपूरला राजकीय आखाड्याचे स्वरुप
मंत्रिपद देऊनही तुम्ही बंडखोरी का केली ? असा प्रश्न शिवसैनिक यड्रावकरांना विचारत आहेत. तर यड्रावकर समर्थकांनी राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी घेतलेला निर्णय योग्य असल्याचे म्हटलं आहे. शिवसैनिक आणि यड्रावकरांचे समर्थक आमने-सामने आल्यामुळे जयसिंगपूरमध्ये राजकीय आखाड्याचे चित्र निर्माण झाले होते. दोन्ही गटाकडून जोरदार घोषणाबाजी कऱण्यात येत होती. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मात्र, त्यानंतरही दोन्ही गटांमध्ये हाणामारी झाल्याचे दिसून आले.