भ्रष्ट कारभारामुळे गेली ५ वर्षे सतत चच्रेत असलेल्या अखिल भारतीय चित्रपट  महामंडळाची निवडणूक २४ एप्रिलला होणार आहे. या निवडणुकीसाठी पाच सदस्यांची  निवडणूक समिती गठीत करण्यात आली असल्याचे निवडणूक समिती अध्यक्ष अ‍ॅड. के.व्ही. पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.महामंडळाचे विद्यमान संचालक आणि कृती समिती यांच्यातल्या वादाने निवडणूक होईल की नाही असे प्रश्नचिन्ह असतानाच निवडणूक कार्यक्रम घोषीत झाल्याने कोल्हापूर, मुंबई, पुणे येथील सभासदांमध्ये हालचाली सुरु झाल्या.
अखिल भारतीय चित्रपट महांमडळाच्या सन २०१६ ते २०२१ या कालावधीच्या संचालक मंडळाची निवडणूक २४ एप्रिलला होणार आहे. ८ मार्चपासून निवडणूक प्रक्रियेस सुरुवात होणार असून निवडणूक समितीने २६ एप्रिल या मुदतीत विविध टप्प्यात निवडणूक कार्यक्रम ठरविला आहे. सभासदांची कच्ची मतदार यादी महामंडळाचे कोल्हापूर, मुंबई, पुणे येथे प्रसिद्ध करण्यात येईल. पक्की मतदार यादी कोल्हापुरात २६ एप्रिलला प्रसिद्ध करण्यात येईल. मतदान २४ एप्रिलला कोल्हापूर, मुंबई, पुणे या तीन केंद्रावर आहे. या तिन्ही केंद्रांची एकत्रित मतमोजणी २६ एप्रिलला कोल्हापूर येथे होणार आहे.
महामंडळातील विद्यमान संचालकांवर अनेक तक्रारी दाखल आहेत. पण त्याबाबतीत कोर्टाचा कसलाही ठोस निर्णय नाही. शिवाय निवडणूक समितीचा त्याच्याशी संबंध नाही. जर धर्मादाय आयुक्तांनी निवडणूक स्थगित करण्यास आदेश दिल्यास निवडणूक थांबवणार, असे निवडणूक समिती अध्यक्ष अ‍ॅड. पाटील यांनी सांगितले.
महामंडळाच्या भोंगळ कारभाराविरुद्ध कृती समितीने धर्मादाय आयुक्तांकडे प्रशासक नेमण्यासाठी धाव घेतली होती. त्यानुसार संचालकांना नोटिसा जावून २१ मार्चला त्यावर सुनावणी होणार होती. पण अचानकच निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्याने आता यावर कृती समितीची काय भूमिका असेल याकडे आता सर्वाचेच लक्ष लागून राहिले आहे.पत्रकार परिषदेला महामंडळाचे सचिव सुभाष बोरगावकर यांच्यासह निवडणूक समितीचे अ‍ॅड. प्रशांत पाटील, आकराम पाटील आणि अ‍ॅड. पी. जे. अतिग्रे आदी उपस्थित होते.