सातारा : सोनगाव कचरा डेपोला लागलेल्या आगीमुळे तब्बल चार दिवस वणव्याचे भीषण कांड अनुभवल्यानंतर आणि कोट्यवधी रुपयांचे नुकसान सोसल्यानंतर सातारा पालिकेला जाग आली आहे. इंदूरच्या इको सेव्ह या कंपनीचे संचालक पुनीत सिसोदिया यांच्या विरोधात मानवी जीवितास धोका निर्माण करून पालिकेच्या मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सातारा पालिकेचे आरोग्य निरीक्षक राकेश गलीयल यांनी सातारा तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. शहरालगतच्या सात एकरामध्ये पसरलेल्या कचऱ्याच्या ढिगांना वणवा लागून आगीचे तांडव आणि अपायकारक धुराचा सामना सोनगाव जकातवाडीलगतच्या परिसराला करावा लागला. गेल्या चार दिवसांपासून ही आग धुमसत असून, ती अद्याप विझलेली नाही. नगराध्यक्ष अमोल मोहिते, उपनगराध्यक्ष ॲड. दत्ता बनकर यांनी परिस्थितीवर नियंत्रण ठेवत यंत्रणेला सूचना दिल्या.
तसेच आरोग्य सभापती धनंजय जांभळे यांनी ४८ तास सतत सोनगाव कचरा डेपोवर राहून पुन्हा आग धुमसणार नाही याची काळजी घेतली आहे. आगीमध्ये नऊ कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेले सोलर पॅनल, तसेच कचरावेचक संघाच्या वतीने फुलवण्यात आलेल्या बांबूच्या शेतीला सुद्धा त्याची झळ बसली. या आगीमध्ये सातारा पालिकेचे कोट्यवधी रुपयांची नुकसान झाले.
प्रसारमाध्यमांनी वणव्याचे सत्र आणि त्याचे वृत्त लावून धरल्यामुळे पालिका प्रशासनावरील दबाव वाढला. नगरसेवक राजू गोरे यांनीसुद्धा संबंधित ठेकेदारावर गुन्हा दाखल करावा, अशी आक्रमक भूमिका घेतल्याने सरतेशेवटी नगरपालिकेने कारवाईचे पाऊल उचलले. आरोग्य निरीक्षक राकेश गलीयल यांनी मानवी जीवितास धोका निर्माण होईल, अशी परिस्थिती निर्माण करून सातारा पालिकेच्या मालमत्तेचे नुकसान करणे याला जबाबदार धरून ‘इको सेव प्रायव्हेट लिमिटेड’चे संचालक पुनीत सिसोदिया यांच्या विरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. सातारा तालुका पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत प्रत्यक्ष कारवाईला सुरुवात केल्याची माहिती आहे.
ठेकेदार कंपनीविरुद्धचे आरोप
सातारा पालिकेच्या सोनगाव येथील कचरा डेपोत मागील चार वर्षांपासून कचऱ्यावर प्रक्रिया करणाऱ्या (बायोमायनिंग) ठेकेदार कंपनीने कचरा डेपोमध्ये मानवी जीवितास धोका निर्माण होईल, अशी परिस्थिती निर्माण केली. सातारा पालिकेच्या मालमत्तेचे नुकसान करणे, नागरिकांच्या जीवितास धोका उत्पन्न होईल असे काम करणे, चुकीच्या पद्धतीने कचरा डेपोत प्रक्रिया करून शिल्लक मालाची विल्हेवाट न लावणे, अधिकार नसताना दुसऱ्याला ठेका देणे आदी आरोप या ठेकेदार कंपनीविरुद्ध करण्यात आले आहे. याबद्दल ‘इको सेव प्रायव्हेट लिमिटेड’चे संचालक पुनीत सिसोदिया यांच्या विरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात विभागाचे प्रमुख आरोग्य निरीक्षक राकेश गलीयल यांनी तक्रार दिली आहे.
