कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी पावसाने उघडीप घेतल्यानंतर रविवारी संध्याकाळी संततधार पावसाची सुरुवात झाली. त्यामुळे पुन्हा एकदा चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. अद्यापही पंचगंगा नदीचे पाणी धोका पातळीवरून वाहत आहे. अशातच राधानगरी धरणाचे चार दरवाजे रविवारी उघडण्यात आले असून त्यात ७ हजार ११२ क्यूसेक विसर्ग सुरू आहे. कोल्हापूर जिल्ह्याला पुराचा धोका कायम आहे.

तीन दिवस अतिवृष्टीमुळे संपूर्ण जिल्हा जलमय झाला आहे. नद्या धोका पातळीपेक्षाही अधिक दिशेने वाहू लागल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. कालच्याप्रमाणे आजही पावसाने उघडीप दिली असल्याने जिल्ह्याला दिलासा मिळाला आहे. पावसाचा जोर कमी झाल्यामुळे नदीची पूर पाणी पातळी कमी होऊ लागली असली तरी अद्याप धोका पूर्णपणे टळलेला नाही. पंचगंगा नदी आज सायंकाळी पाच वाजता पाणी पातळी ५१ फूट होती तर धोका ४३ फूट आहे. अन्य नद्यांचीही अशीच अवस्था आहे. त्यामुळे लोकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर केले जात आहे.

राधानगरी धरण उच्चत्तम पातळीपर्यंत भरले असून चार स्वयंचलीत दरवाजे खुले झाले आहेत. यातून प्रत्येकी १४२८ प्रमाणे २८५७ क्यूसेक व वीज निर्मितीसाठी १४०० असा ४२५७ क्यूसेक विसर्ग भोगावती नदीत सुरू झाला आहे. धरणाची दुपारी ३ वाजता पाणी पातळी ३४७ फूट होती. एखादा स्वयंचलीत दरवाजा खुला झाला की धरण भरले असे समजले जाते. पाणलोट क्षेत्रात पाऊस वाढल्याने पातळी वाढली व पाठोपाठ दोन दरवाजे खुले झाले.