कोल्हापूर : स्वस्तात मस्त चविष्ट मासा अशी जाहिरातबाजी करून संरक्षित क्षेत्रातील पाकट माशाची विक्री करणे एका विक्रेत्याला चांगलेच भोवले आहे. याप्रकरणी विक्रेताने समाज माध्यमात जाहिरातबाजी केल्यानंतर जाग आलेल्या वनविभागाने मासे विक्री सुरू असणाऱ्या ठिकाणी जाऊन छापा टाकला. मृत मासा ताब्यात घेऊन वन विभागाने संबंधित विक्रेत्यावर वन्यजीव संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.

फुलेवाडी बाह्य वळण रस्त्यावर कोल्हापूर फ्रेंडशिप फिश कंपनी नावाचे मासे विक्रीचे दुकान आहे. विक्रेत्याने १३० किलो वजनाचा स्पाईन टेल डेव्हिल रे तथा पाकट नावाचा एक भला मोठा मासा विक्रीसाठी आणला होता. महाकाय मासा दुकानासमोर टांगून ठेवला होता. प्रति किलो १३० रुपये प्रमाणे याची विक्री होणार आहे. तो रस्सा, फ्राय, तंदूर अशा कोणत्याही प्रकारे खाता येतो. मासा मटणासारखा चविष्ट असल्याचा दावा विक्रेत्यांनी चित्रफितीमध्ये केला होता. मासा खरेदी करायचा नसला तरी किमान पाहण्यासाठी तरी या, असे आवाहन विक्रेत्याने केले होते. यामुळे हा मासा पाहण्यासाठी, खरेदीसाठी उत्सुकता निर्माण झाली होती.

विक्रेता गळाला

दरम्यान, समाज माध्यमांमध्ये ही चित्रफीत अग्रेषित झाली. यानंतर कोल्हापूर वन विभागाला याची जाग आली. करवीर वन पथकाने या ठिकाणी जाऊन छापा टाकून संबंधित मासा ताब्यात घेतला आहे. याप्रकरणी विक्रेता सुनील विनोद सातपुते (रा. येडे मच्छिंद्र, ता. वाळवा) याच्यावर पुन्हा दाखल केला आहे. स्पाईन टेल डेव्हिल रे हा संरक्षित व अति धोक्यात असलेल्या वन्यजीव मासा विक्री साठी आणलेला होता. संबंधित ठिकाणी छापा मारून करवीर (कोल्हापूर) परिक्षेत्र पथकाने हस्तगत करून वन्यजीव संरक्षण कायदा १९७२ अंतर्गत गुन्हा दाखल केल्याचे वनविभागाच्या पत्रकात म्हटले आहे.

यापूर्वीही अनेकदा विक्री

यापूर्वीही कोल्हापुरात अशा प्रकारचे संरक्षित असणारे मासे खुलेआम विकले गेले आहेत. त्याची अनेकदा समाज माध्यमातुन चित्रफिती अग्रेषित झाल्या होत्या. हा मासा पाहण्यासाठी, खरेदीसाठी मोठी गर्दी झाली होती. गटारी अमावश्या, धुळवड, किंक्रांत अशा वेळी अनेकदा संरक्षित मोठे मासे विक्रीसाठी येत असतात, अशीही खवय्यांमध्ये चर्चा आहे. मात्र तेव्हा कारवाई करणे वन विभागाला सुचले नव्हते. आज किमान कारवाई केल्याचे तरी दिसून आले.