कोल्हापूर : भाजप नेते किरीट सोमय्या यांनी गैरव्यवहाराचे आरोप केल्यावर हसन मुश्रीफ यांनी त्यांच्या विरोधात अब्रू नुकसानीचा दावा दाखल करण्याचा इशारा दिला आहे. या दाव्याची न्यायालयात भरण्यासाठीची आवश्यक रक्कम कार्यकर्त्यांमधून उभी केली जात आहे. हे निधीसंकलन सध्या चर्चेचा विषय झाले आहे.

सोमय्या यांनी मुश्रीफ यांच्यावर आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप केल्यानंतर हे प्रकरण राज्यभर गाजत आहे. सोमय्या यांना प्रत्युत्तर देण्यासाठी मुश्रीफ यांनी अब्रूनुकसानीचा १०० कोटी रुपयांचा दावा दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. याकामी २५ टक्के रक्कम दावापूर्व भरणे गरजेचे असते. ही रक्कम या दाव्यामध्ये २५ कोटी रुपये होते. हाच मुद्दा घेऊन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुश्रीफ यांना उद्देशून इतकी मोठी रक्कम भरण्यासाठी पांढरा पैसा असावा लागतो. काळ्या पैशातून ती उपलब्ध करणार का, असा सवाल केला होता. या वर ‘मी लोकांकडून पैसे गोळा करून हा दावा लढेन’ असे प्रतिउत्तर मुश्रीफ यांनी दिले होते. या पार्श्वभूमीवर कागल, गडहिंग्लज परिसरात मुश्रीफ यांच्या कार्यकत्र्यांकडून सध्या अशाप्रकारे निधी संकलन केले जात आहे.

इतकी मोठी रक्कम उपलब्ध करणे हे आव्हान आहे. मुश्रीफ यांच्या कागल शहरात २५ लाख रुपये,गडहिंग्लज शहरातून १० लाख रुपये दिले जाणार आहेत.