पंचगंगा स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कोल्हापूर : परिवर्तन चळवळीतील लढाऊ नेते, श्रमिकांचे आधारवड, ज्येष्ठ विचारवंत प्रा. एन. डी. पाटील अनंतात विलीन झाले. येथील पंचगंगा स्मशानभूमीत मंगळवारी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. उपस्थितांनी साश्रुनयनांनी अखेरचा निरोप दिला.

राज्य शासनाच्या वतीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिवंगत प्रा. एन. डी. पाटील यांना श्रद्धांजली वाहिली. प्रा. एन. डी. पाटील हे राज्यातील चालतं-बोलतं विद्यापीठ होते. जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी पाटील सरांनी सतत संघर्ष केला. अन्यायाविरुद्ध आवाज उठवून न्याय मिळेपर्यंत त्यांनी संघर्ष सोडला नाही, म्हणून  संघर्षाचं दुसरं नाव प्रा. एन. डी. पाटील असेच म्हणावे लागेल, अशा भावपूर्ण शब्दांत उपमुख्यमंत्री पवार यांनी येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना आपल्या भावना व्यक्त केल्या. 

यावेळी पालकमंत्री सतेज पाटील, सहकार राज्यमंत्री विश्वजित कदम, आमदार अरुण लाड, महानगरपालिका आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनीही पाटील यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र, पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहिली.

पोलीस दलातर्फे त्यांना शोकप्रसंगीचे बिगूल वाजवून आणि बंदुकीच्या तीन फैरी हवेत झाडून सशस्त्र मानवंदना देण्यात आली. पाटील यांच्या पत्नी सरोज, मुलगा प्रशांत व सुहास, स्नूषा संगीता, नात रिया यांच्यासह कुटुंबातील सदस्य उपस्थित होते. करोनाच्या पार्श्वभूमीवर कुटुंबातील मोजक्याच सदस्यांच्या उपस्थितीत दिवंगत प्रा.पाटील यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. 

अंत्यदर्शनासाठी रीघ

 तत्पूर्वी दिवंगत प्रा. एन. डी. पाटील यांचे पार्थिव येथील राजर्षी छत्रपती शाहू महाविद्यालयाच्या प्रांगणात अंत्यदर्शनासाठी सकाळी आठ वाजता ठेवण्यात आले होते. ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांच्यासह, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, पालकमंत्री सतेज पाटील, माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी दिवंगत पार्थिवाचे अंत्यदर्शन घेऊन श्रद्धांजली वाहिली. यावेळी खासदार, लोकप्रतिनिधी, शिक्षण, सहकार, सामाजिक क्षेत्रासह विविध क्षेत्रातील मान्यवर, शेतकरी, कामगार, नागरिक यांनी अंत्यदर्शन घेण्यासाठी सकाळपासून रीघ लावली होती. जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रा. एन. डी. पाटील यांनी केलेल्या कार्याचे स्मरण होऊन उपस्थितांचे डोळे पाणावले.

Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Funeral at panchganga cemetery akp
First published on: 19-01-2022 at 00:18 IST