कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील दुष्काळी तालुक्यांची संख्या पाच वरून सात करण्यात आल्यानंतर आता अन्य तालुक्यातून ही तालुका दुष्काळी करण्याची मागणी होऊ लागले आहे. याच मुद्द्यावरून गडहिंग्लज य येथे दोन गट एकमेकांना भिडक्याचा प्रकार समोर आला आहे. दरम्यान, याप्रकरणी मंगळवारी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेऊन तालुका दुष्काळी करण्याची मागणी केली आहे. चंदगडचे आमदार शिवाजी पाटील यांनीही अशीच मागणी लावून धरली आहे.
गडहिंग्लज तालुक्यात यंदा अपुऱ्या व लहरी पावसामुळे निर्माण झालेल्या गंभीर परिस्थितीमुळे आणि तालुका दुष्काळी घोषित करण्याच्या मागणीवरून नागरिक विशेषता शेतकरी आक्रमक आहेत याच मागणीवरून गडहिंग्लज येथे धरणे आंदोलन सुरू आहे. या संदर्भात आयोजित केलेल्या एका बैठकीवेळी दोन गटातील वाद पुढे आले.
काय घडले?
एका बाजूला तालुक्यातील काही शेतकरी संघटना आणि विरोधकांनी पर्जन्यमानाची आणि पिकांची वस्तुस्थिती पाहता तालुका तातडीने दुष्काळी घोषित करावा, अशी आक्रमक भूमिका घेतली होती. तर दुसऱ्या बाजूला प्रशासकीय आकडेवारीनुसार पावसाची नोंद पुरेशी असल्याचे सांगत स्थानिक पातळीवर दुष्काळ जाहीर करण्यास विरोध दर्शवत होते. यातून मतभेद विकोपाला जाऊन समर्थकाचे दोन भिन्न गट आमनेसामने आले. दुष्काळाच्या प्रश्नावर ठोस निर्णय होण्याबाबत ऐवजी वाद रंगल्याचे पाहण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली.

मुश्रीफांची धाव मंत्र्यांकडे
या वादाच्या पार्श्वभूमीवर, वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री हसन मुश्रीफ यांनी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली आहे. मुश्रीफ यांनी गडहिंग्लज तालुक्यातील स्थानिक परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करून आणि शेतकऱ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन तालुक्याचा दुष्काळी किंवा दुष्काळसदृश यादीत समावेश करावा, अशी ठाम मागणी महसूलमंत्र्यांकडे केली आहे.
रब्बी हंगाम धोक्यात
तालुक्यात सरासरीच्या तुलनेत अत्यंत कमी आणि अनियमित पाऊस झाल्यामुळे विहिरी व बोअरवेलच्या पाण्याची पातळी कमालीची खाली गेली आहे. त्यामुळे खरीप पिकांचे प्रचंड नुकसान झाले असून आगामी रब्बी हंगामावरही याचे गंभीर सावट पसरले आहे. शेतात उभी असलेली पिके सुकू लागल्यामुळे पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. मात्र, शासकीय निकष आणि पर्जन्यमापक यंत्रावरील नोंदींच्या आधारे दुष्काळ जाहीर करताना तांत्रिक अडचणी येत असल्याचा दावा एका गटाकडून केला जात आहे. याउलट, प्रत्यक्षात जमिनीवर असलेली परिस्थिती अत्यंत बिकट असून केवळ कागदी आकडेवारीवर अवलंबून न राहता शासनाने शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घ्यावा, अशी मागणी दुसऱ्या गटाकडून लावून धरली जात आहे. या परस्परविरोधी भूमिकमांमुळे गडहिंग्लज तालुक्यात राजकीय व सामाजिक स्तरावर मोठा वाद पेटला आहे. आता शासन काय निर्णय घेते, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.
