सातारा : गणेशोत्सवानिमित्त कोकणातील आपल्या मूळ गावी जाणाऱ्या लाखो भाविकांसाठी राज्य शासनाने अत्यंत दिलासादायक निर्णय घेतला आहे. यंदा ११ सप्टेंबर ते २७ सप्टेंबर २०२६ या कालावधीत कोकणाकडे जाणाऱ्या सर्व गणेशभक्तांच्या वाहनांना टोलमाफी देण्याची घोषणा सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केली आहे. या संदर्भातील अधिकृत शासन परिपत्रक सार्वजनिक बांधकाम विभागाने प्रसिद्ध केले आहे.

​मिळणार ‘कोकण दर्शन’ विशेष पास

गणेशभक्तांचा प्रवास सुलभ व्हावा यासाठी ‘गणेशोत्सव २०२६ कोकण दर्शन’ नावाचे विशेष स्टिकर किंवा पास उपलब्ध करून दिले जाणार आहेत. वाहनाचा क्रमांक आणि चालकाचे नाव नमूद असलेले हे पास पोलीस ठाणे, वाहतूक पोलीस चौक्या आणि आरटीओ कार्यालयांमध्ये मिळतील. हाच पास परतीच्या प्रवासासाठीही ग्राह्य धरला जाणार आहे. खाजगी वाहनांसोबतच कोकणात जाणाऱ्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसनाही टोलमाफी लागू राहील.

​गणेशोत्सव हा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा गाभा आहे. मुंबई, ठाणे आणि पुण्यातून कोकणात जाणाऱ्या भाविकांची संख्या मोठी असल्याने महामार्गांवर वाहतूक कोंडी टाळणे आणि प्रवाशांचा आर्थिक भार कमी करणे हा या निर्णयामागचा मुख्य उद्देश आहे. टोल नाक्यांवर गर्दी होऊ नये यासाठी पोलीस, परिवहन विभाग आणि वाहतूक शाखेला आपापसात समन्वय ठेवून काम करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

आपल्या लाडक्या गणरायाच्या स्वागतासाठी कोकणात जाणाऱ्या भक्तांचा प्रवास सुरक्षित, सुलभ आणि आनंददायी व्हावा यासाठीच शासनाने हा निर्णय घेतला आहे. सर्व यंत्रणांनी संवेदनशीलतेने काम करावे. – शिवेंद्रसिंहराजे भोसले, सार्वजनिक बांधकाम मंत्री

या मार्गांवर मिळणार टोलमाफी

  • ​मुंबई – बंगळूर राष्ट्रीय महामार्ग
  • ​मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्ग
  • ​सार्वजनिक बांधकाम विभाग व एमएसआरडीसी’ च्या अखत्यारीतील कोकण मार्ग
  • ​अटल बिहारी वाजपेयी शिवडी-न्हावा शेवा ‘अटल सेतु’