सातारा : जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी आज साताऱ्यात येऊन खासदार उदयनराजे भोसले यांची त्यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. यावेळी दोन्ही नेत्यांनी अर्धा तास बंद दाराआड चर्चा केली.

या वेळी आमदार मनोज घोरपडे, माजी आमदार आनंदराव पाटील, सातारा लोकसभा संयोजक सुनील काटकर, प्रतापगड प्राधिकरण समितीचे सदस्य काका धुमाळ, जिल्हा परिषद सदस्य अजित साळुंखे, सतीश भोसले, नगरसेवक पंकज चव्हाण, माजी नगरसेवक बाळासाहेब ढेकणे, कल्याण राक्षे, ॲड. विनीत पाटील, लक्ष्मण कडव आदी उपस्थित होते.

या वेळी खासदार उदयनराजे यांनी त्यांचे शिवसन्मान चिन्ह, शाल, पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. या वेळी दोन्ही नेत्यांत अर्धा तास विविध विषयांवर चर्चा झाली. राज्यातील आगामी राजकीय बदलांवर, तसेच विविध विकासकामे, जलव्यवस्थापन आणि आपत्ती व्यवस्थापनासंदर्भात या दोघांत चर्चा झाली.

दरम्यान, मंत्री महाजन यांनी राजमाता कल्पनाराजे भोसले यांचीही भेट घेऊन आशीर्वाद घेतले, तसेच त्यांच्याशी विविध विषयांवर चर्चा केली.

या वेळी मंत्री महाजन यांना या दौऱ्याबाबत विचारले असता ते म्हणाले, माझे राजघराण्याशी अत्यंत जिव्हाळ्याचे व घरोब्याचे संबंध आहेत. पुणे येथे कार्यक्रमासाठी आलो होतो. कार्यक्रमाच्या व्यस्त दौऱ्यातून वेळ काढून मी आज खासदार उदयनराजे भोसले यांची भेट घेतली. ही भेट सदिच्छेची होती. यात कोणताही राजकीय हेतू नव्हता. आम्ही आमच्या कॉलेज जीवनातील आठवणींवर गप्पा मारल्या. त्या प्रसारमाध्यमांना सांगण्यासारख्या नाहीत, अशी टिप्पणी खासदार उदयनराजेंनी केली.