कोल्हापूर : गोकुळ दूध संघाची निवडणूक महायुती म्हणून एकत्र येऊन लढवण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला असला, तरी प्रत्यक्षात पक्षांतर्गत आणि नेत्यांमध्ये आजी-माजी पदाधिकाऱ्यांचे पुनर्वसन करण्यासाठी चढाओढ लागली आहे. यामुळे गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीतील जागावाटपाचा गुंता आता थेट मुख्यमंत्र्यांच्या दरबारी पोहोचला आहे. जिल्ह्यातील भाजप आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये एकमत होत नसल्याने अखेर हा तिढा सोडवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्तक्षेप करून सोडवावा अशी वेळ आली आहे. उद्या मुंबईत याबाबत चर्चा होणार असल्याचे सांगण्यात येते.
गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीसाठी भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि शिवसेना (शिंदे गट) या तिन्ही पक्षांकडून आपल्याच पक्षाचा प्रभाव कसा जास्त आहे, हे सिद्ध करण्याचा प्रयत्न सुरू आहे. विशेषतः संख्याबळ आणि ठरावांच्या संख्येवरून प्रत्येक पक्ष जादा जागांवर दावा सांगत असल्याने जागावाटपाचा फॉर्म्युला रखडला आहे गोकुळच्या निवडणुकीत विजयाची भिस्त ही प्रामुख्याने दूध संस्थांच्या ठरावांवर अवलंबून असते. कोणत्या पक्षाकडे नेमके किती आणि कोण-कोणतेृतृत अधिकृत ठराव आहेत याची पडताळणी करताना स्थानिक नेत्यांमध्ये जुंपल्याचे पाहायला मिळाले.
काल भाजप कार्यालयात हसन मुश्रीफ आणि चंद्रकांत पाटील या मंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीतही ठरावांच्या पडताळणीवरून वाद झाल्याने बैठक अर्धवट सोडून नेत्यांना अन्यत्र जावे लागले होते. त्यातून महायुतीतील अंतर्गत धुसफूस समोर आली होती. यामुळे राष्ट्रवादी आणि भाजपच्या स्थानिक कार्यालयांमध्ये झालेल्या बैठकांमध्ये ठरावांच्या मुद्द्यावरून जाहीर मतभेद आणि खडाजंगी उडाली. मित्रपक्षांमधील ही वाढती धुसफूस निवडणुकीच्या तोंडावर महायुतीसाठी डोकेदुखी ठरत आहे.
कोल्हापूरच्या या अत्यंत प्रतिष्ठेच्या आणि आर्थिकदृष्ट्या बलाढ्य असलेल्या गोकुळ दूध संघावर वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी महायुतीमधील स्थानिक नेत्यांना आपापसातील मतभेद मिटवण्यात अपयश आले आहे. याबाबत आज फारशी चर्चा पुढे सरकली नाही. आता अंतिम निर्णय मुख्यमंत्री आणि महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांच्या दरबारातून काय निघणार याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेले आहे. मुख्यमंत्र्यांच्या दरबारीही तोडगा निघाला नाही तर महायुतीत बिघाडी होऊन मैत्रीपूर्ण लढत किंवा बंडखोरीची शक्यता नाकारता येत नाही अशी चर्चा जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात सुरू आहे.
