कोल्हापूर : गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीच्या निमित्ताने सतेज पाटील – महाडिक यांच्या सलगी वाढताना दिसत आहे. हे दोन गट एकत्र येऊन हसन मुश्रीफ यांना आव्हान देणार असे चित्र निर्माण केले जात आहे. याकडे आज वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचे पत्रकारांनी लक्ष वेधले. त्यावर ते म्हणाले की, तसे काही चालू असल्याची मला कल्पना नाही. परंतु राजकारणात कोणी कोणाचा कायमचा मित्र व शत्रू असत नाही. सतेज पाटील – महाडिक एकत्र येणार असतील तर त्यासाठीही माझ्या शुभेच्छा आहेत. पण, आम्ही गोकुळ आणि कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक युती म्हणून लढू,. एकदा गोकुळचे यादी पक्की झाली की पॅनल ची रचना कशी असेल याबद्दल सविस्तर बोलीन,असे मत त्यांनी व्यक्त केले.

ती भेट स्वागतार्ह

काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील आणि भाजप नेते आमदार शिवाजी पाटील यांची भेट हा एक स्वागतार्ह उपक्रम आहे. त्यास माझ्या शुभेच्छा आहेत, अशी टिपणी मंत्री हसन मुश्रीफ यांनी या भेटीवर केली.

त्यांच्याच भेटी कशा?

सतेज पाटील हे काँग्रेसचे मोठे नेते आहेत. ते निवडणूक लढणार आहेत. त्यासाठी त्यांनी गाठीभेटी सुरू केल्या असून तो प्रचाराचा एक भाग आहे परंतु त्यांनी त्यांच्या भेटी घेतल्या. ते बहुतेक सगळे माझ्या विरोधात बोलणारे कसे आहेत, असा मिश्किल प्रश्न उपस्थित केला. परंतु सतेज पाटील यांचा गोकुळच्या निवडणुकीत पराभव होणार आणि महायुतीचा विजय होणार ही काळया दगडावरची पांढरी रेष आहे, असा पुनरुच्चार मुश्रीफ यांनी यांनी केला.

महायुती अंतर्गत टीकाटिपणी

गोकुळच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती अंतर्गत टीका टिपणी, पत्रकबाजी सुरू झाली आहे. एकमेकांवर शरसंधान केले जात आहे. त्यामुळे ही निवडणूक महायुतीच्या माध्यमातून होण्यावर प्रश्नचिन्ह लागत असल्याकडे मुश्रीफ यांचे लक्ष वेधण्यात आले. त्यावर ते म्हणाले की, कोणाला काही वाटू दे. कोणी काही करू दे. परंतु गोकुळची निवडणूक महायुतीच्या माध्यमातून लढवली जाणार आणि ती जिंकली जाणार.

गोकुळचा रणसंग्राम कसा?

कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ म्हणजेच गोकुळ दूध संघ निवडणुकीच्या निमित्ताने राजकीय रणसंग्राम चांगलाच रंगला आहे. ही निवडणूक महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी होण्याची चिन्हे आहेत. गोकुळच्या इतिहासात प्रथमच त्यावर प्रशासक नियुक्त करण्यात आला आहे. हाच भ्रष्टाचाराचा आणि अनागोंदीचा मुद्दा प्रचाराच्या केंद्रस्थानी आहे. मागील पाच वर्षांत झालेल्या कारभारावर आणि भ्रष्टाचारावर शामिका महाडिकांनी बोट ठेवले आहे.

सतेज पाटील यांनी सर्व २५ जागांवर समविचारी आघाडीच्या माध्यमातून लढण्याचा आणि ताकद दाखवण्याचा इरादा व्यक्त केला आहे, तर मुश्रीफ, महाडिक यांनी त्यांच्या या आव्हानाची खिल्ली उडवत सर्व जागा जिंकण्याचा दावा केला आहे.