कोल्हापूर : गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीसाठी जिल्ह्यातील महायुतीच्या नेत्यांनी कंबर कसली आहे. जिल्ह्यातील महायुतीच्या प्रमुख नेत्यांची एक महत्त्वाची बैठक शनिवारी होऊन छत्रपती शाहू शेतकरी विकास आघाडीची घोषणा करण्यात आली.
या बैठकीला पालकमंत्री प्रकाश आबिटकर, उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, जनसुराज्य शक्ती पक्षाचे संस्थापक-अध्यक्ष आमदार विनय कोरे, खासदार धनंजय महाडिक, आमदार अमल महाडिक, जनसुराज्य पक्षीचे प्रदेशाध्यक्ष समीत कदम यांच्यासह महायुतीचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार महायुतीच्या प्रमुख नेत्यांची ही बैठक सकारात्मक वातावरणात झाली असून निवडणूक महायुतीमधील सर्व घटक पक्ष मिळून पूर्ण ताकदीने लढवण्याचा निर्णय झाला. महायुतीचे सर्व घटक पक्ष गोकुळची निवडणूक छत्रपती शाहू शेतकरी विकास आघाडी ह्या नावाने लढवणार असल्याची माहिती माजी मंत्री विनय कोरे यांनी बैठकीनंतर दिली.
शिवाजी पाटील अनुपस्थित
गोकुळची निवडणूक कोणत्याही परिस्थितीत महायुती म्हणूनच एकत्रित लढवायची, यावर सर्वपक्षीय नेत्यांचे एकमत झाले. तथापि, गोकुळच्या कारभारविरोधात आवाज उठवणारे चंदगडचे भाजप समर्थक आमदार शिवाजी पाटील हे अनुपस्थित असल्याने त्याची चर्चा होत आहे. आमदार शिवाजी पाटील यांनी गोकुळची निवडणूक हसन मुश्रीफ यांच्या सोबत लढवणार नसल्याचे म्हटले होते. त्यामुळे शिवाजी पाटील यांना महायुतीतून वगळले गेले आहे का? याची चर्चा होत आहे.
विरोधकांची समविचारी आघाडी
दरम्यान, गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीसाठी ठराव मागवण्याची प्रक्रिया सुरू झाली असताना दुसरीकडे राजकीय हालचाली गतिमान झाल्या आहेत. गोकुळची निवडणूक महायुतीच्या माध्यमातून लढवली जाणार असल्याचे सांगितले जात असताना यामध्ये स्थान मिळण्याबाबत साशंकता असल्याने कोल्हापूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष, आमदार सतेज पाटील यांनी राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढवण्याचे निश्चित केले आहे. याबाबत त्यांनी प्राथमिक सहकारी दूध संस्थांना पत्र पाठवून आपली भूमिका विशद केली आहे. आमदार पाटील यांनी पाठवलेल्या या पत्रात म्हटले आहे की, जिल्ह्यातील एक अग्रगण्य संस्था असलेल्या गोकुळची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे.
गेल्या पाच वर्षात गोकुळच्या माध्यमातून शेतकऱ्यांना न्याय देण्याची भूमिका घेतली आहे. गोकुळची सत्ता एक विचाराने काम करणाऱ्या चांगल्या लोकांच्या हाती असावी यासाठी दूध संस्थेच्या माध्यमातून योग्य व्यक्तींच्या नावावर ठराव करणे, या ठरावधारकांनी निवडणुकीमध्ये भविष्यकाळात गोकुळ टिकला पाहिजे या दृष्टीने चांगली भूमिका घेणे महत्त्वाचे आहे. पक्षीय राजकारणात न अडकता गेल्या पाच वर्षांमध्ये गोकुळ चांगल्या पद्धतीने चालवण्याचा प्रयत्न मी केला आहे. पण गेले तीन महिने महायुतीमध्ये सुरू असलेला वाद आपण सर्वजण अनुभवत आहात, असे म्हणत त्यांनी टीका केली आहे. त्यामुळे गोकुळच्या निवडणुकीकडे पक्षीय भूमिकेतून न पाहता दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या हिताची ही व्यवस्था टिकली पाहिजे अशा पद्धतीने याकडे पाहणे आवश्यक आहे. म्हणून अशी व्यापक भूमिका असणाऱ्या सभासदांच्या नावे आपल्या संस्थेचा ठराव करावा, ही विनंती.
