कोल्हापूर : येत्या २५ वर्षाचा विचार करून दिशादर्शक भूमिका गोकुळच्या विकासासाठी घ्यावी लागेल. त्यासाठी गोकुळमध्ये एकमुखी नेतृत्व असणे गरजेचे आहे. गोकुळच्या प्रगतीसाठी आणि दूध उत्पादक संस्थांना न्याय देण्यासाठी शाहू शेतकरी समविचारी पॅनेलला पाठींबा द्या, असे आवाहन काँग्रेसचे विधान परिषदेचे गटनेते सतेज पाटील यांनी बुधवारी केले. सध्याच्या परिस्थितीत सुनावणी आणि हरकतींच्या नावाने त्रास दिला जात असून, गावातील दूध संस्था बदनाम का केल्या जात आहेत, असा सवाल आमदार पाटील यांनी यावेळी उपस्थित केला.
गोकुळ निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर आज आमदार सतेज पाटील आजरा तालुकातील शेतकरी, दूध उत्पादक आणि ठरावधारकांची भेट घेतली. या दरम्यान जिल्हा परिषद सदस्य सुधीर देसाई ,उदय देसाई, रणजीत देसाई, शिवसेना (ठाकरे) जिल्हाप्रमुख सुनील शिंत्रे, भाजपचे ग्रामीण उपाध्यक्ष जयवंत सुतार, संभाजी पाटील, युवराज पाटील आणि अनिकेत चराटी या प्रमुख नेत्यांसह दूध उत्पादक आणि ठरावधारकांच्या भेटी घेतल्या. यावेळी ते बोलत होते. गोकुळ दूध संघ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडीच्यावतीने आमदार सतेज पाटील यांनी आजरा तालुक्यातील विविध गावांचा दौरा केला. या दौऱ्यादरम्यान त्यांनी बहिरेवाडी, मुम्मेवाडी, उत्तूर, मडीलगे, आजरा शहर, किणे, कोळिंद्रे, पेद्रेवाडी, पेरणोली, देव कांडगाव आणि अर्धाळ येथील ठरावधारकांशी थेट संवाद साधला.
यावेळी ठरावधारकांशी संवाद साधताना आमदार सतेज पाटील म्हणाले, गेल्या पाच वर्षांत आम्ही केवळ दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या हिताचा कारभार केला आहे. हे पॅनल थेट शेतकऱ्यांचे आहे. जिल्ह्यातील साडेपाच लाख दूध उत्पादक शेतकऱ्यांचा गोकुळ दूध संघ टिकला पाहिजे हाच माझा मुख्य हेतू आहे. याचबरोबर येत्या काळात पशुखाद्याचे दर कमी केले जातील. दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी दुधाचे दर वाढवले जातील. म्हैस खरेदीसाठी विशेष अनुदान दिले जाईल आणि म्हैस-गाय दूध उत्पादन वाढीसाठी ठोस प्रयत्न केले जातील. तसेच गेल्या पाच वर्षांत गोकुळचा वापर राजकारणासाठी कधीही केला नाही.
गोकुळच्या अधिक प्रगतीसाठी आणि सर्वसामान्यांना न्याय मिळण्यासाठी पॅनलला पाठबळ देण्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी आजरा जनता बँकेचे मुकुंद देसाई म्हणाले की, जिल्ह्यात सहकार टिकवण्याचे काम अनेकांनी केले आहे. मंत्री हसन मुश्रीफ आणि आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वात गोकुळचा कारभार उत्तमरित्या चालला आहे. त्यामुळे आजरेकर पुन्हा एकदा ही सत्ता चांगल्या माणसांच्या हाती देतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. गोकुळच्या संचालिका अंजना रेडेकर यांनी, गेल्या पाच वर्षांत नेत्यांच्या विश्वासाला पात्र राहून पाच लाख दूध उत्पादकांच्या हिताची कामे केल्याचे सांगत, पुढील काळातही चांगलं काम करण्याची संधी आम्हाला ठराव धारकांनी द्यावी, असे प्रतिपादन केले.
यादौऱ्यात राहुल देसाई, सत्यजित जाधव, रणजितसिंह पाटील, अभिजीत तायशेटे, विद्याधर गुरबे, सचिन घोरपडे, शामराव देसाई, प्रकाश वासकर, विश्वनाथ करंबळी, एम. डी. देसाई, विजय सावेकर, स्वागत परुळेकर, दशरथ अमृते, विजय पाटील, किरण कांबळे, नौशाद बुडेखान, निसार लाडजी, आशेद सुमीखान, आसिफ पटेल, महादेवराव हेब्बाळकर, अनिल फडके, नंदकुमार सरदेसाई यांच्यासह शेतकरी आणि ठरावधारक मोठ्या संख्येने सहभागी झाले.
