कोल्हापूर : गोकुळ दूध संघाची बदनामी महायुतीतील वादामुळे होत आहे,अशी टीका काँग्रेसचे विधान परिषदेचे गटनेते सतेज पाटील यांनी सोमवारी केली. गोकुळ दूध संघातील संघाच्या निवडणुकीमध्ये एकसंघपणे उतरण्याचा निर्णय महायुतीतील नेत्यांनी घेतली आहे. यामुळे सतेज पाटील यांना एकाकी वाटचाल करावी लागणार आहे. गोकुळच्या घडामोडी बाबत बोलताना आज आमदार सतेज पाटील यांनी गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीसाठी गळ्यात गळे घालायचे होते तर याबाबतचा महायुती अंतर्गत वाद आधीच का मिटवला नाही, असा प्रश्न उपस्थित केला.

गोकुळ दूध संघात महायुतीचा अध्यक्ष झाल्यामुळे आणि महायुतीतील अंतर्गत वादामुळे दूध संघाची बदनामी होत चालली आहे. महायुतीचे नेते एकत्रित निवडणूक लढवणार असले तरी आम्ही स्वबळावर निवडणूक लढवणार आहोत. गोकुळचे सभासद आम्हाला प्रतिसाद देतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पश्चिम महाराष्ट्रामध्ये सहकार काँग्रेसमुळे वाढला आहे. परंतु या संस्थांमध्ये कधी राजकारण आणले नाही. आम्हीही पक्षाच्या बिल्ला लावून कधी जिल्हा बँक, गोकुळ मध्ये गेलो नाही.

परंतु आता महायुतीच्या माध्यमातून निवडणूक लढवायचे म्हणत असले तरी त्यांच्यातील अंतर्गत वाद मिटताना दिसत नाही. एक भावकी म्हणते की वाद मिटले आहेत. दुसरे म्हणते अजून वाद सुरू आहे. त्यामुळे महायुतीत नेमके काय चालले आहे हे लोकांनाही कळेनासे झाले आहे.
अद्याप गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीबाबत स्पष्टता दिसत नाही. नव्याने वाढवलेल्या संस्थांबाबत नेमका काय निर्णय होतो यावर बरेचसे भवितव्य अवलंबून असणार आहे, असे आमदार पाटील म्हणाले.

वह्या वाटप दरम्यान, पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त संकलित झालेल्या वयांचे वितरण आज एका कार्यक्रमात करण्यात आले. यावेळी बोलताना पाटील यांनी सकारात्मक उपक्रमासाठी समाज उभा राहतो, वह्यावाटपातून हे सिद्ध झाले आहे. १८ वर्षात जिल्हा परिषद आणि महापालिका शाळांतील १६ लाख ९० हजार गरजू विद्यार्थ्यांना ७६ लाख ८५ हजार वह्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविल्या आहेत. हा व्यापक उपक्रम जनतेपर्यंत नेण्यासाठी लोकांचे विशेष योगदान आहे.

कार्यकर्ते आणि हितचिंतक यांच्या मदतीने ८ कोटींपेक्षा जास्त रकमेच्या वह्या गरजू विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवल्याचे समाधन आहे. भारतीय राष्ट्रीय युवा काँग्रेसचे सरचिटणीस अजय छिकारा, भारतीय राष्ट्रीय युवा काँग्रेसचे सचिव नवज्योत सिंग संधू, राष्ट्रीय युवक काँग्रेस सचिव शांभवी शुक्ला, नेहल चौपाने, राहुल बजरंग देसाई, महापालिका विरोधी पक्षनेता राजू लाटकर, गटनेता इंद्रजीत बोंद्रे, जि.प. गटनेता एकनाथ पाटील, , राधानगरी पं. स. सभापती आर. वाय.पाटील, गगनबावडा सभापती छाया देसाई, शशिकांत पाटील – चुयेकर ,सूर्यकांत पाटील, बाळासाहेब सरनाईक, सरलाताई पाटील, युवक काँग्रेसचे शहर अध्यक्ष उदय पोवार, जिल्हाध्यक्ष वैभव तहसीलदार यांच्यासह विद्यार्थी, युवक काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते, मोठ्या संख्येने उपस्थित होते.