मुंबईः कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघावर- गोकुळ कब्जा करण्यासाठी राज्य सरकारने धावाधाव सुरु केली आहे. त्यानुसार सहकारी संस्थांवर चार तज्ज्ञ संचालक नेमण्याचा आणि त्यांना मताधिकार देणारी सुधारणा सरकार कायद्यात करण्यात येणार आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या उद्या होणाऱ्या बैठकीत याबाबतचा प्रस्ताव मांडण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
गोकुळ दूध संघाची पंचवार्षित निवडणूक काही दिवसांपूर्वीच पार पडली. या निवडणुकीत काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांच्या राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडीने महायुतीच्या दिग्गज नेत्यांसमोर कडवे आव्हान उभे करीत ही निवडणूक जिंकली. या निवडणुकीत राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडीला १३ तर महायुतीला १२ जागांवर समाधान मानावे लागले आहे. सर्व ताकद पणाला लावूनही झालेला पराभव महायुतीच्या नेत्यांच्या जिव्हारी लागला असून कोणत्याही परिस्थितीत गोकुळवर कब्जा करण्यासाठी सरकारने धावपळ सुरु केली आहे. गोकुळच्या अध्यक्ष निवडीसाठी गेल्या आठवड्यात झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीवर महायुतीच्या १२ संचालकांनी बहिष्कार टाकल्यानंतर सतेज पाटील गटाने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यावर येत्या १० नोव्हेंबरला संचालक मंडळाची पुन्हा बैठक बोलाविण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यानुसार गोकुळवर कब्जा करण्यासाठी कायदेशीर तरतूदींचा वापर करण्याच्या हालचाली शासनदरबारी सुरू झाल्या आहेत. त्यासाठी सहकार कायद्यात सुधारणा करुन सहकारी संस्थामध्ये चार शासन नियुक्त तज्ज्ञ संचालकांची वर्णी लावली जाणार असून या संचालकांना मतदानाचाही अधिकारी दिला जाणार आहे.
राज्यमंत्रिमंडळाच्या उद्या होणाऱ्या बैठकीत याबाबचा प्रस्ताव मांडला जाण्याची शक्यता असून मंत्रिमंडळाच्या मान्यतेनुसार अद्यादेश काढला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. या कायदेशीर तरतुदींच्या माध्यमातून गोकुळवर चार संचालक नेमण्यात येऊन महायुतीच्या संचालकांचे संख्याबळ १६ करण्याचा आणि त्याच्या माध्यमातून सत्ता मिळविण्याचा महायुतीचा प्रयत्न राहणार आहे.
विद्यमान संचालकांना अधिकार
राज्यात गेल्या काही महिन्यांपासून सहकारी संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. तालुका आणि जिह्याच्या राजकारणाची आर्थिक सत्ता मानल्या जाणाऱ्या सर्व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकाच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. त्याचप्रमाणे सहकारी साखर कारखाने, पतसंस्था, सहकारी बँका, सूतगिरण्या, बाजार समित्या, पणन संघ अशा विविध ४ ते ५ हजार सहकारी संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू होती. मात्र भीषण दुष्काळामुळे महायुती सरकारने सुमारे पाच हजार सहकारी संस्थाच्या निवडणुका दिर्घकाळ लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील दोन महिन्यात होणाऱ्या सुमारे पाच हजार तसेच पुढील वर्षात होणाऱ्या २० हजार संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडल्या आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांमधील नाराजी दूर करण्यासाठी मुदत संपलेल्या संस्थांवर प्रशासक न नेमता विद्यमान संचालक मंडळालाच कारभार करण्याची मुभा देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यानुसार सरकार कायद्यात सुधारणा करण्यात येणार असून सध्या अ वर्ग संस्था वगळून अन्य सर्व संस्थांसाठी असलेली ही व्यवस्था आता साखर कारखाने, जिल्हा बँका, सुतगिरण्या, बाजार समित्या अशा अ वर्ग संस्थासाठीही लागू केली जाणार आहे.
