कोल्हापूर : गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीसाठी कोल्हापूर जिल्ह्यातील महायुतीच्या नेत्यांमध्ये मतैक्य घडत नसल्याने मुख्यमंत्र्यांच्या दरबारी जागा वाटपाबाबत पहिले सादरीकरण झाले. त्यामध्येही एकमत घडून आले नाही. अखेर महायुतीतील स्थानिक नेत्यांनी जागा वाटपाचे अधिकार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सोपवले आहेत. दोन दिवसात जागावाटप निश्चित होईल, असे स्थानिक नेत्यांचे म्हणणे आहे.
गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीसाठी महायुती अंतर्गत जागा वाटपाची स्पर्धा रंगली आहे. यामुळेच कोणाला किती जागा मिळणार यावरून दावे प्रति दावे सुरू आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात याबाबत चर्चेची आवर्तने पार पडले तरी त्यामध्ये एकमत घडू शकले नाही. त्यामुळे सर्वपक्षीय नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत बैठक घेऊन आपल्या पक्षाला किती जागा मिळाल्या पाहिजेत ठराव किती याबाबतची वस्तुस्थिती कथन केली. निवडणुकीच्या एकूण प्रवासा वेळी अडवणुकीचे धोरण कसे राबवले गेले याबाबत यावर प्रकाशझोत टाकण्यात आला. स्थानिक नेत्यांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर फडणवीस यांनी याबाबत आपला निर्णय कळवणार असल्याचे स्पष्ट केले आहे. येत्या एक-दोन दिवसात याबाबत ते अंतिम निर्णय घेतील. तो सर्वांना मान्य असेल असे सांगितले जात आहे.
या बैठकीवेळी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री प्रकाश आबिटकर, उच्चतंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार धनंजय महाडिक, आमदार सर्वश्री विनय कोरे, चंद्रदीप नरके, अमल महाडिक, माजी खासदार संजय मंडलिक, माजी आमदार के. पी. पाटील, जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित कदम उपस्थित होते.
जागावाटपात रस्सीखेच
चंद्रकांत पाटील यांनी भाजप साठी आठ जागांची तर मुश्रीफ यांनी दहा जागांची मागणी केली. अबीटकर यांनी शिवसेनेला आठ जागा मिळाल्या पाहिजेत असे सांगितले. तर विनय कोरे यांनी दोन ऐवजी तीन जागा मिळण्याचा आग्रह धरला. एकूणच जागा वाटपाचे हक्क सांगतानाही रस्सीखेच दिसून आली.
नेत्यांची धावपळ उडणार
गोकुळच्या निवडणुकीसाठी ८ ऑक्टोबर रोजी माघारीची अंतिम मुदत आहे. यापूर्वी जागा वाटपाचा अंतिम निर्णय घेणे, त्यावर पक्षांनी आपले उमेदवार निश्चित करणे या गोष्टी कराव्या लागतील. शिवाय, मर्जीतील ठरावधारकांना अर्ज मागे घेण्यास सांगण्याची प्रक्रियाही करावी लागणार आहे. कमी कालावधीत अनेक घडामोडी कराव्या लागणार असल्याने नेत्यांची धावपळ उडणार आहे.
जागा वाटपाकडे लक्ष
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जागा वाटपाचा नेमका कोणता फार्मूला वापरतात, कोणत्या पक्षाला किती जागा मिळतात, ठराव संख्येनुसार जागावाटपाचे सूत्र कसे असणार याकडेही लक्ष वेधले गेले आहे.
