कोल्हापूर : गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीसाठी निवडणूक कार्यालयाकडून पाठवण्यात आलेल्या मसुद्यांची संख्या आणि त्यासाठी महायुती, समविचारी आघाडी व स्वतंत्ररीत्या उमेदवारी अर्ज दाखल केलेल्यांकडून दावा करण्यात आलेली संख्या यामध्ये सुमारे ३ हजारांचा फरक दिसत आहे. नेत्यांचे दावे अवास्तव असून, हा केवळ अधिकाधिक जागा पदरात पाडून घेण्यासाठी चाललेला हा आटापिटा आहे. नेत्यांनी केलेला दावा आणि प्रत्यक्षात दाखल झालेले ठराव यामध्येही २३०० हून अधिक संख्येचा फरक आहे. यामुळे जागावाटपाचा वाद चिघळण्याची शक्यता आहे.

निवडणूक विभागाकडून गोकुळच्या ४८४४ प्राथमिक दूध संस्थांना मसुदे पाठवण्यात आले. ठरावधारक प्रतिनिधी निश्चित करण्यावरून गावोगावी दूध संघांमध्ये जोरदार संघर्ष रंगला. यातून काही संस्थांनी दुबार, तर काहींनी तिबार ठराव दाखल केले आहेत. तर, अंतर्गत वादामुळे ३१ संस्थांनी ठरावच दाखल केला नाही.

संस्थापातळीवर ठरावधारक प्रतिनिधी नियुक्त करण्याचा सावळा गोंधळ सुरू असताना सर्वपक्षीय नेत्यांनी शक्तिप्रदर्शन करण्यामागे आपल्याकडे अधिकाधिक ठराव असल्याचे दाखवण्याचा डाव दिसून आला. मात्र या अनिष्ट स्पर्धेतून खऱ्या ठरावांपेक्षा दाखल ठरावाची संख्या वाढवून सांगितली गेली आहे. परिणामी प्रत्येकाकडील खरा आकडा गुलदस्तात राहिला आहे.

वाढता वाढता वाढे

अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी १९८२ इतके सर्वाधिक ठराव दाखल केले असल्याची घोषणा करीत स्पर्धेत पहिले वजनदार पाऊल टाकले. पाठोपाठ एकाच दिवशी शिंदे सेनेचे नेते, पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी १५८१ ठराव दाखल केल्याचा दावा केला. भाजपचे खासदार धनंजय महाडिक यांनी १४३० ठराव सोबत असल्याचे सांगितले. भाजपचा मित्रपक्ष असलेल्या जनसुराज्य शक्ती पक्षाने स्वतंत्र ठराव दाखल केले. या पक्षाचे संस्थापक, आमदार विनय कोरे यांनी ५४५ संस्थांची शक्ती आपल्या मागे असल्याचे दाखवून दिले.

काँग्रेस-महा विकास आघाडीच्या संपर्कात असणारे ए. वाय. पाटील यांनी स्वतंत्ररीत्या २०४ तर ठाकरे सेनेचे माजी आमदार सत्यजित पाटील सरूडकर यांनी १५४ ठराव दाखल केले. महायुतीशी सामना करण्यासाठी सज्ज झालेले काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांनी १८५१ ठराव आपल्या बाजूने असल्याची घोषणा केली.

पायपोस उरला नाही

या साऱ्या सावळ्या गोंधळात मसुदे पाठवलेल्यांची संख्या, नेत्यांनी केलेले दावे आणि प्रत्यक्षात दाखल ठराव यामध्ये कशाचा कशाला पायपोस उरलेला नाही. निवडणूक विभागाने ४८४४ मसुदे पाठवले होते. प्रत्यक्षात ५४३९ ठराव दाखल झाले आहेत. तर सर्वपक्षीय नेत्यांनी जाहीर केलेला ठरावांचा आकडा हा तब्बल ७७४९ इतका भरभक्कम झाला आहे.

पोकळ दावे संघर्षाची नांदी 

 गोकुळची निवडणूक महायुतीच्या झेंड्याखाली लढवण्याची तयारी सुरू आहे. साहजिकच येथे नेत्यांची तुंबळ गर्दी झाली आहे. आपल्या गटाला, पक्षाला अधिक जागा मिळवण्याची होड सुरू झाली आहे. यातूनच प्रत्यक्षात असणारे ठराव आणि जाहीर केलेले ठराव यामध्ये महद अंतर आहे. या पोकळ दाव्यामुळेच महायुतीत जागावाटप करताना संघर्ष होण्याची चिन्हे दिसत आहेत. समाधानकारक जागा मिळाल्या नाहीत, तर महायुतीलाच आव्हान मिळण्याची शक्यता आहे.