मुंबई : कोल्हापूरमधील गोकुळ दुध महासंघावर कब्जा मिळविण्यासाठीच सत्ताधारी महायुतीने चार संचालकांची नियुक्ती करून त्यांना मतदानाचा अधिकार बहाल केला आहे. हा सत्ताधाऱ्यांचा रडीचा डाव असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.
साम, दाम, दंड, भेद वापरूनही कोल्हापूरच्या स्वाभिमानी शेतकऱ्यांनी गोकुळ दूध संघ हातात दिला नाही. निवडणुकीतील हा पराभव महायुतीला एवढा जिव्हारी लागला आहे की, आता थेट सहकार कायद्यातच छेडछाड करून मागच्या दाराने ४ संचालक घुसवून गोकुळ ताब्यात घेण्याचा लाचार प्रयत्न सत्ताधारी करत आहेत. ही लोकशाही नाही, तर गुंडगिरी आहे., अशी टीका काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केली.
गोकुळ ताब्यात घेण्यासाठी पाच शासनमान्य सदस्यांची नियुक्ती करून त्यातील चौघांना मतदानाचा अधिकार देण्याचा महायुती सरकारचा निर्णय हा संविधान आणि लोकशाही धुडकावून गोकुळवर कब्जा मिळवण्याचा डाव आहे, असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला.
गोकुळ निवडणुकीत सत्ताधाऱ्यांची अक्षरशः अब्रू गेली आहे.अवघा सत्ताधारी वर्ग एकत्रितपणे निवडणूक लढवत असताना देखील बंटी पाटलांनी जनमताच्या पाठिंब्यावर विजयश्री खेचून आणली. ही बाब सत्ताधारी गटाला अजून पचलेली दिसत नाही. आज त्यांनी गोकुळवर चार शासन नियुक्त सदस्यांची नेमणूक केली आहे. आता याबाबत समस्त कोल्हापूरकरांनी लक्ष घालणे गरजेचे आहे, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केले.
आज ‘गोकुळ’ दूध संघाच्या स्वायत्ततेवर घाला घातला जात आहे. ५ हजार ४०० दूध संस्था आणि साडेपाच लाख शेतकऱ्यांच्या लोकशाही कौलाचा आदर राखला गेलाच पाहिजे. केवळ संघ ताब्यात ठेवण्याच्या धावपळीतून किंवा राजकीय कुरघोडीतून शासन नियुक्त संचालकांचा हस्तक्षेप झाल्यास या नावारूपाला आलेल्या संस्था मोडकळीस येतील. अशी प्रतिक्रिया शिवसेना शिंदे गटाचे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी व्यक्त केली.
