कोल्हापूर : येथील बहुचर्चित आणि सहकार क्षेत्रातील अतिशय महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या ‘गोकुळ’ दूध संघाच्या अध्यक्षपदाच्या निवडीचा तिढा आता सुटण्याच्या मार्गावर आहे. अध्यक्षपदाच्या निवडणुकीसंदर्भात उच्च न्यायालयाच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचने मंगळवारी महत्त्वपूर्ण आदेश दिले आहेत. त्यानुसार आगामी १० नोव्हेंबर रोजी गोकुळच्या अध्यक्षपदासाठीची निवडणूक सभा घेण्याचे आदेश देण्यात आले असून या प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी संघाच्या सर्व २५ संचालकांना नोटीस बजावण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत.
कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळ दूध संघाच्या अध्यक्ष निवडीचा तिढा अखेर सुटण्याच्या मार्गावर असून मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचने या प्रकरणात महत्त्वपूर्ण आदेश दिला असून सर्व संचालकांना नोटीस काढण्याचे निर्देश दिले आहेत.
गेल्या महिन्यात झालेल्या गोकुळच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील राजर्षी शाहू समविचारी आघाडीने १३ जागा जिंकून सत्ता मिळवली होती तर महायुती पुरस्कृत छत्रपती शाहू शेतकरी विकास आघाडीला १२ जागांवर समाधान मानावे लागले होते, त्यानंतर २९ ऑक्टोबर रोजी अध्यक्ष निवडीसाठी बोलावण्यात आलेल्या विशेष सभेत महायुतीच्या १२ संचालकांनी सभेवर बहिष्कार टाकत गैरहजर राहण्याचा निर्णय घेतला होता.
गोकुळच्या उपविधीनुसार अध्यक्ष निवडीसाठी १४ संचालकांची गणपूर्ती आवश्यक असते. केवळ १३ संचालक उपस्थित असल्याने पीठासीन अधिकारी तथा करवीरच्या उपविभागीय अधिकारी मौसमी चौगुले यांनी गणपूर्ती अभावी सभा तहकूब केली होती. सभा तहकूब झाल्यानंतर उपस्थित १३ संचालकांनी तिथेच स्वतंत्र बैठक घेऊन शशिकांत पाटील-चुयेकर यांची एकमताने अध्यक्ष म्हणून निवड केल्याचा दावा केला होता.
या निर्णयाला अध्यक्षीय अधिकाऱ्यांनी नकार दिल्याने समविचारी आघाडीच्या १३ संचालकांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर ३० ऑक्टोबर रोजी न्यायमूर्ती अभय आहुजा आणि नीरज धोटे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली असता न्यायालयाने गणपूर्तीचा मुद्दा उपस्थित करत तहकूबीनंतर लिहिलेल्या इतिवृत्तावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. १२ महायुती संचालकांना २ नोव्हेंबर रोजी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले होते. त्याचबरोबर राज्य सरकार आणि राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाला देखील प्रतिवादी करून घेण्याचे निर्देश दिले होते. नियमानुसार संचालक निवडणुकीनंतर १५ दिवसांच्या आत अध्यक्ष निवड बंधनकारक असून त्याची मुदत ३ नोव्हेंबर रोजी संपत असल्याने या प्रकरणाला अधिकच महत्त्व प्राप्त झाले होते.
आता सर्किट बेंचच्या आदेशानंतर पुढील अध्यक्ष निवडीची सभा १० नोव्हेंबर रोजी होणार असून सर्व संचालकांना नोटीस बजावून कायदेशीर पद्धतीने निवड प्रक्रिया पार पाडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे गोकुळच्या सत्तेचा हा वाद आता न्यायालयाच्या निर्णयानंतरच सुटणार हे स्पष्ट झाले आहे. सर्किट बेंचमध्ये झालेल्या सुनावणीदरम्यान निवडणूक प्रक्रियेतील विविध तांत्रिक मुद्द्यांवर आणि घडामोडींवर सविस्तर युक्तिवाद झाला. नैसर्गिक न्याय आणि नियमांचे पालन करत सर्व संचालकांना कायदेशीररीत्या पूर्वसूचना देण्याची गरज न्यायालयाने अधोरेखित केली.
१२ नोव्हेंबर निर्णायक
न्यायालयाच्या निर्देशानुसार, सर्व २५ संचालकांना नोटीस देऊन निवडणूक प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने पार पाडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार येत्या १० नोव्हेंबर रोजी सकाळी ठीक ११ वाजता गोकुळच्या अध्यक्षपदाची निवडणूक प्रक्रिया सुरू होईल. या घडामोडींमुळे कोल्हापूरच्या सहकार आणि राजकीय वर्तुळाचे लक्ष या निवडणुकीकडे लागले आहे. गोकुळ दूध संघाचे अध्यक्षपद निवडीसाठी दहा नोव्हेंबरला होणाऱ्या बैठकीसाठी गणपूर्ती होणार का, महायुतीचे १२ संचालक उपस्थित राहणार का, यासह अध्यक्षपदाच्या आरूढ होण्यासाठी कोण बाजी मारणार हे औत्सुक्याचे ठरणार आहे.
