कोल्हापूर : गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदाची निवड वैध ठरवण्याच्या मागणीची याचिका शुक्रवारी समविचारी आघाडीच्या वतीने दाखल करण्यात आली. याबाबत २ नोव्हेंबर रोजी पुढील सुनावणी होणार असल्याचे न्यायालयाने सांगितले.गोकुळ दूध संघाच्या अध्यक्ष निवडीची काल बैठक झाली. त्यास गणपूर्तीसाठी १४ संचालक उपस्थित नसल्याने निवडणूक निर्णय अधिकारी मौसमी चौगुले यांनी सभा तहकूब झाल्याचे जाहीर केले.
यानंतर समविचारी आघाडीने बैठक घेऊन बहुमताचा १३ संचालकांचा आकडा असल्याने पूर्ण असल्याचे सांगत अध्यक्षपदी शशिकांत पाटील चुयेकर यांची निवड करण्यात आली. दरम्यान, आज आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील समविचारी आघाडीच्या १३ संचालकांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या येथील सर्किट बेंचमध्ये एक याचिका दाखल केली. त्यामध्ये काल संचालक मंडळाचे बैठकीवेळी १४ संचालक उपस्थित नसल्याने बैठक तहकूब झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी जाहीर केले होते. तथापि सर्वोच्च न्यायालयातील निकालाचे काही संदर्भ पाहता बहुमतातील१३ संचालकांनी केलेली अध्यक्ष पदाच्या निवडीला मान्यता द्यावी. गोकुळ मधील प्रशासक मंडळाला स्थगिती द्यावी, अशी मागणी वकील आशुतोष कुंभकोणी यांनी केली.
तर महायुतीचे संचालक डॉ. चेतन नरके यांच्या वतीने वकील साखरे यांनी १२ संचालकांना याचिकेमध्ये समाविष्ट करण्यात यावे, अशी मागणी केली. राज्य शासनाच्या वकिलांनी तसेच निवडणूक प्राधिकरणांच्या वकिलांनी या याचिकेत आपणास सहभागी करून घेण्याची मागणी केली. याबाबत न्यायालयाने २ नोव्हेंबर रोजी याबाबत पुढील सुनावणी होणार असल्याचे स्पष्ट केले.
