कोल्हापूर : राज्यातील सहकारातील सर्वात मोठ्या गोकुळ दूध संघाची निवडणूक जवळ येऊन ठेपली आहे, तसे आरोप -प्रत्यारोपाला उधाण आले आहे. गोकुळ मध्ये भ्रष्टाचार होत असल्याची चर्चा यापूर्वीही रंगली होती. परंतु आता त्यामध्ये महायुतीच्या आमदारांनीच रंग भरल्याने गोकुळचे लोणी कोण मटकावत आहे, असा गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे.

गोकुळ दूध संघात भ्रष्टाचार वाढला आहे. या प्रकरणाची ईडीमार्फत चौकशी करण्यात यावी अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन करणार आहे, अशी माहिती भाजपचे चंदगडचे आमदार शिवाजीराव पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीचे घटक असलेल्या आमदार पाटील यांनी ही भूमिका घेतल्याने त्याला राजकीयदृष्ट्या वेगळेच महत्व प्राप्त झाले आहे.यावेळी अशोक चाराटी, दीपक पाटील, रवींद्र बांदिवडेकर, वकील विजय कडूकर, शांताराम पाटील, श्रीशैल नागराळ आदी उपस्थित होते.

आमदार पाटील म्हणाले, कोल्हापूर जिल्हा दूध संघ (गोकुळ) ही राज्यातील शेतकऱ्यांच्या कष्टातून उभी राहिलेली महत्त्वाची संस्था असल्याने तिचे पावित्र्य अबाधित राहणे आवश्यक आहे. ही संस्था घराणेशाहीच्या ताब्यात जाऊ नये ही आपली भूमिका आहे.

बेकायदेशीर संस्था वाढ

यापूर्वी गोकुळ मध्ये ३८० दूध संस्था अस्तित्वात होत्या. अलीकडच्या काळात तब्बल ३७०० नवीन संस्था महेश कदम या अधिकाऱ्याने मंजूर केल्या आहेत, असा आरोप त्यांनी केला. कदम हे एका मंत्र्यांच्या मेहरबानीने दुग्ध विभागामध्ये आले आहेत, असे म्हणत त्यांनी मंत्री हसन मुश्रीफ यांना लक्ष्य केले.

आंदोलनाचा इशारा

गोकुळ दूध संघात भ्रष्टाचार वाढला आहे. बेकायदेशीर दूध संस्थांची वाढ होत आहे. या सर्व प्रक्रियेची ईडीमार्फत चौकशी व्हावी अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली जाणार आहे. गोकुळच्या कारभाराबाबत अधिवेशनामध्ये लक्षवेधी मांडणार आहे. याबाबत कारवाई न झाल्यास जन आंदोलन करण्यात येईल प्रसंगी आमरण उपोषणाचा प्रारंभ करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री न्याय देतील

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निकटचे आमदार अशी शिवाजीराव पाटील यांची ओळख आहे. मुख्यमंत्री फडणवीस हे गोकुळ बाबत योग्य ती चौकशी लावून शेतकऱ्यांना न्याय देतील. या प्रकरणात लवकरच ठोस निर्णय त्यांच्याकडून होईल, अशी अपेक्षा आमदार पाटील यांनी व्यक्त केली.

म्हणून गोकुळ विरोधात लढा

गोकुळ दूध संघामध्ये करवीर, राधानगरी आणि कागल या तालुक्यातील काही प्रभावशाली गटांचा ताबा आहे. त्यांच्याकडेच गोकुळ दूध संघाचे नेतृत्व गेल्यास चंदगड, गडहिंग्लज, आजरा या दक्षिणेकडील भागावर परिणाम होण्याची भीती आमदार पाटील यांनी व्यक्त केली. आपण महायुतीचा भाग असूनही भ्रष्टाचाराविरुद्ध भूमिका ठाम आहे. गोकुळमध्ये भ्रष्टाचाराचा कळस गाठला आहे. एका अधिकाऱ्याद्वारे हजारो संस्था एका विशिष्ट गटासाठी मंजूर होत असतील तर ते गंभीर आहे. याबाबत मुख्यमंत्री शेतकऱ्यावर अन्याय होऊ देणार नाहीत, असे आमदार पाटील म्हणाले.