कोल्हापूर : गोकुळ दूध संघामध्ये तज्ञ व शासन नियुक्त संचालकांची संख्या वाढवण्यात यावी, या मागणीचे निवेदन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवले आहे. यावरून गोकुळ मधील समविचारी आघाडीचे नेते सतेज पाटील यांनी अशा प्रकारे नियमापेक्षा अधिक तज्ञ, स्वीकृत संचालक नियुक्त करण्याने लोकशाहीचा गळा घोटल्यासारखे होईल, असे म्हणत विरोध दर्शवतानाच या विरोधात जनतेनेही आवाज उठवावा, असे आवाहन मंगळवारी येथे केले आहे.

गोकुळ दूध संघाची निवडणूक होऊन २५ पैकी १३ जागा समविचारी आघाडीने मिळवल्या. तर १२ जागा महायुतीच्या खात्यात गेल्या. गोकुळ अध्यक्ष निवडीची पहिली बैठक गणपूर्ती अभावी तहकूब करण्याचा निर्णय निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी घेतला होता. त्या विरोधात समविचारी आघाडीच्या संचालकांनी कोल्हापूर सर्किट बेंच मध्ये धाव घेतली असता न्यायालयाने अध्यक्ष निवडीची बैठक पंधरा दिवसात घ्यावी असे आदेश दिले आहेत.

सतेज पाटलांचा विरोध

सद्यस्थितीत गोकुळ मध्ये बहुमतात असलेले आमदार सतेज पाटील यांनी राज्य शासनाच्या पातळीवर सुरू असलेल्या सत्ताधाऱ्यांच्या हालचालींना विरोध केला आहे. याबाबत आमदार पाटील यांनी मंगळवारी सांगितले की, गोकुळमध्ये शासन नियुक्त संचालक येणार आणि त्यांना मतदानाचा अधिकार मिळणार अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. सहकाराच्या दृष्टीने ,राज्याच्या हिताने जो कौल बहुमताच्या बाजूने आहे तो स्वीकारला पाहिजे. ठरावधारकांचा कौल आमच्या १३ संचालक बहुमताच्या बाजूने आहे. विरोधात १२ संचालक बैठकीस उपस्थित राहून आमचा अध्यक्ष होण्यासाठी मदत देखील करू शकतात.

मी महाराष्ट्रातल्या लोकांनाही आवाहन केले आहे की, शासनाच्या विचाराधीन आहे असे झाले झालं तर मतदानाला अर्थच राहणार नाही. लोकांनी मतदान करायचं कशाला, निवडून द्यायचे कशाला आणि बहुमत तरी कशाला लागणार?, असा प्रश्न उपस्थित करून सतेज पाटील यांनी हे घडू नये यासाठी मी ही विनंती लोकांना केलेली आहे.

उद्या राज्य मंत्रिमंडळाची बैठक होणार असून त्यात काय होणार हे मला माहिती नाही. मात्र असे काही होऊ नये असा माझा प्रयत्न आहे. माझी विनंती आहे की सहकारात हे संयुक्तिक नाही आणि योग्यही नाही. तीन हजार कोटी पेक्षा जास्तच्या संस्थांना हे पत्र आहे. फक्त तीन हजार कोटीचे काम उद्या विकास सेवा संस्था असतील. एखादी दुसरी संस्था असेल, इतरही संस्थांना नियम लावा असं सांगतील, असं होणार नाही.

उद्या जिल्हा मध्यवर्ती बँका आहेत. तिथेही महानगरपालिकांमध्ये स्वीकृत नगरसेवक असेल. त्यांनाही मतदानाचा अधिकार दिला जाईल. पण हे संयुक्तिक नाही. स्थानिक स्वराज्य संस्था या मतदानाद्वारे आणि लोकांच्या बहुमताने चालल्या पाहिजेत, पण ते जर मोडून काढणं असेल तर ते कितपत योग्य आहे?, असा प्रश्न सतेज पाटील यांनी उपस्थित केला.

गोकुळचे दूध उत्पादक असलेल्या साडेपाच लाख शेतकऱ्यांसाठी ही निवडणूक महत्त्वाची होती. त्यांना न्याय देणं हा आमचा अजेंडा आहे आणि ते बारा लोक उपस्थित राहणं हे त्यासाठी आवश्यक आहे. त्यामुळेच गोकुळचे दिवंगत अध्यक्ष आनंदराव पाटील चुयेकर यांचे चिरंजीव अध्यक्ष होतील, असाही विश्वास यावेळी सतेज पाटील यांनी व्यक्त केला.

महायुतीकडून शह

दरम्यान, गोकुळ अध्यक्ष निवडीसाठी शह-काटशहाचे राजकारण सुरू झाले आहे. गोकुळ दूध संघामध्ये दोन तज्ञ व तितकेच शासन नियुक्त सदस्य निवडले जातात. त्या ऐवजी ही संख्या प्रत्येकी चार इतकी करण्यात यावी, अशी मागणी मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. याशिवाय, या तज्ञ, स्वीकृत संचालकांना मताचा अधिकार देण्यात यावा, अशीही महत्त्वपूर्ण मागणी केली आहे. यामुळे गोकुळ दूध संघात १२ संचालक असलेल्या महायुतीचे संख्याबळ वाढण्याबरोबरच बहुमतही प्राप्त होणार आहे. त्या आधारे गोकुळमध्ये महायुतीचा अध्यक्ष करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.