कोल्हापूर : ​गोकुळ दूध संघामध्ये लोकशाहीच्या माध्यमातून आम्ही सहकार जपला. पण महायुती सरकारने फक्त गोकुळसाठी सहकार कायदा बदलला. गोकुळसंदर्भातील सर्व निर्णय हे मुख्यमंत्री घेत आहेत.,अशी टीका काँग्रेसचे विधान परिषदेचे गटनेते सतेज पाटील यांनी केली.
गोकुळ निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर राधानगरी तालुक्यातील शेतकरी, दूधउत्पादक आणि ठरावधरकांच्या भेटी आमदार पाटील यांनी घेतल्या. या दौऱ्यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले की,गोकुळच्या साडेपाच लाख शेतकऱ्यांच्या हितासाठी मी धडपडत आहे. हे माझ्यासाठी पुण्याईच काम आहे. गोकुळमध्ये लोकशाहीतून सहकार जपण्याचं काम आम्ही केले.

त्यामुळे गोकुळच्या प्रत्येक सभासदाचा तसेच संस्थांचा हक्क आणि हित जपण्यासाठी आमचा संघर्ष कायम सुरू राहील, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या. स्वर्गीय आनंदराव पाटील- चुयेकर साहेबांच्या मुलाला गोकुळचा अध्यक्ष करताना भाजपवाल्यांनी का विरोध केला, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. आमची संस्था अपात्र झाली होती, मात्र सतेज पाटील यांच्या प्रयत्नांमुळे पात्र झाल्याने आम्हाला मताचा अधिकार मिळाला. म्हणून पहिला शिक्का त्यांच्या पॅनेललाच देणार, असे मत ठरावधारक संजय भोपळे यांनी व्यक्त केले.

जिल्हा बँकेचे संचालक ए. वाय. पाटील, गोकुळचे माजी अध्यक्ष अरुण डोंगळे, धीरज डोंगळे, बी. के. डोंगळे, संजय डोंगळे, धैर्यशील पाटील- कौलवकर, उदयसिंह पाटील- कौलवकर, सदाशिव चरापले, सुशिल पाटील- कौलवकर आदींची त्यांनी भेट घेतली. अभिजीत तायशेटे, रणधीर मोरे, राहुल देसाई, सत्यजित जाधव, बाबासो चौगले, शशिकांत पाटील- चुयेकर, प्रकाश पाटील, बयाजी शेळके, अंजना रेडेकर, विश्वजीत रणजीतसिंह पाटील, विद्याधर गुरबे, सचिन घोरपडे यांच्यासह राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.