कोल्हापूर : राज्यातील सर्वात मोठ्या गोकुळ दूध संघावर प्रथमच प्रशासक नियुक्त करण्यात आला आहे. पाच अधिकाऱ्यांचे प्राधिकारी अधिकारी मंडळ यापुढे संघाचे कामकाज पाहणार आहे. हा निर्णय भाजप समर्थक आमदार शिवाजी पाटील, प्रकाश बेलवाडे यांना दिलासा देणारा तर वैद्यकीय शिक्षण मंत्री गोकुळचे नेते यांना धक्का मानला जात आहे.
साताऱ्याचे जिल्हा उपनिबंधक संजय कुमार सुद्रिक अध्यक्ष असलेल्या प्राधिकृत अधिकारी मंडळांमध्ये चंदगडचे सहाय्यक निबंधक प्रदीप मालगावे, मुळशी येथील सहाय्यक निबंधक सुनील धायगुडे, पणन विभागाचे लेखापरीक्षक सागर बलकवडे व कोल्हापूर जिल्हाधिकारी धर्मादाय रुग्णालय कक्षाचे अध्यक्ष चंद्रकांत परळकर अशा पाच जणांचा समावेश आहे.
गोकुळ दूध संघाची संचालक मंडळाची मुदत ४ मे रोजी संपुष्टात आली. सहकार कायद्यातील नव्या तरतुदीनुसार संचालक मंडळाची पदे पुढे सुरू राहू शकत नसल्याने तसेच व्यवस्थापक मंडळांमधील पोकळी दूर करण्यासाठी उपरोक्त पाच जणांचे प्राधिकृत अधिकारी मंडळ नियुक्त करीत असल्याचे पत्र पुणे दुग्ध विभागाचे उपनिबंधक राजकुमार पाटील यांनी जारी केले आहे.
दावा खरा ठरला
संचालक मंडळाची मुदत संपल्यानंतर गोकुळ मध्ये प्रशासक नियुक्त होणार असा दावा भाजप समर्थक आमदार शिवाजी पाटील, गर्जना संघटनेचे अध्यक्ष प्रकाश बेलवाडे यांनी केला होता. तर त्यांचे विधान म्हणजे अफवा आहे असे मत गोकुळचे अध्यक्ष नवीद मुश्रीफ यांनी व्यक्त केले होते. तथापि आता गोकुळमध्ये प्राधिकारी अधिकारी मंडळ नियुक्त झाल्यामुळे मुश्रीफ यांचे विधान फोल ठरले असून आमदार पाटील व प्रकाश बेलवाडे यांचे म्हणणे खरे ठरले आहे.
लढ्याची परिणीती
त्यामुळे आमदार पाटील आणि प्रकाश बेलवाडे यांनी केलेल्या दाव्यानुसार यापुढे गोकुळ दूध संघातील भ्रष्टाचाराचे प्रकरणे उघडकीस येण्याची शक्यता आहे. तसेच नव्याने वाढवण्यात आलेल्या ११०८ प्राथमिक दूध संस्थांच्या अस्तित्वावरही टांगती तलवार राहण्याची शक्यता दिसत आहे. हा निर्णय भाजप समर्थक आमदार शिवाजी पाटील, प्रकाश बेलवाडे यांना दिलासा देणारा तर वैद्यकीय शिक्षण मंत्री गोकुळचे नेते यांना धक्का मानला जात आहे. प्रकाश बेलवाडे यांनी गोकुळ दूध संघाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे, विशेषतः २०२२-२३ या काळातील अनियमिततेवर प्रश्न उपस्थित केले होते. प्रकाश बेलवाडे यांनी गोकुळच्या कारभारात पारदर्शकता आणण्यासाठी आणि भ्रष्टाचाराच्या चौकशीसाठी कायदेशीर मार्गाने लढा दिला आहे, ज्याचे परिणाम म्हणून आता गोकुळमध्ये मोठे बदल घडून आले आहेत.
