कोल्हापूर : गोकुळ दूध संघाच्या अध्यक्ष निवडीचे राजकारण एकीकडे तापले असताना दुसरीकडे या संस्थेत शासन नियुक्त संचालक नियुक्त करण्याच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत. गोकुळ सारख्या या मलईदार संस्थेत शासन नियुक्त संचालकांची संख्या वाढवून एकूण संचालक मंडळ ३३ जणांचे करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. यासाठी कोल्हापुरातील एका मंत्र्यांनी शासनाकडे पत्र पाठवले आहे. हे पत्र समाज माध्यमात अग्रेसर झाल्याने खळबळ उडाली आहे

कोल्हापूर जिल्ह्याचा राजकीय आणि आर्थिक कणा असलेल्या ‘गोकुळ’ (कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ) च्या संचालक मंडळाबाबत एक मोठी घडामोड समोर आली आहे. गोकुळ दूध संघातील संचालकांची एकूण संख्या तब्बल ३३ वर पोहोचण्याची शक्यता निर्माण झाली असून, शासननियुक्त संचालकांची संख्या वाढवण्यासंदर्भात एका बड्या नेत्याने दिलेले पत्र सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहे.

ही काय भानगड ?

या पत्रात उल्लेख नसला तरी शासननियुक्त २ ऐवजी ४ संचालक नेमण्यासाठी कायद्यात सुधारणा करायची आणि निवडून आलेल्या संचालकांप्रमाणे या शासननियुक्त सदस्यांना देखील मतदानाचा अधिकार देण्याचे कारस्थान महायुती सरकारचे आहे का? सत्ता मिळवायची म्हणून अशी खेळी अगोदरपासून सुरू होती काय ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

व्हायरल झालेल्या पत्रातील माहितीनुसार, ३ हजार ते ४ हजार कोटींपेक्षा अधिक वार्षिक उलाढाल असणाऱ्या मोठ्या सहकारी संस्थांमध्ये शासननियुक्त आणि संस्थानियुक्त सदस्यांची (संचालक) संख्या प्रत्येकी दोनवरून चार करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. सध्या गोकुळ दूध संघात निवडून आलेले आणि विद्यमान शासननियुक्त असे मिळून संचालक कार्यरत असताना, या नव्या मागणीमुळे आणखी तीन शासननियुक्त संचालकांची भर पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे गोकुळच्या संचालक मंडळाची एकूण सदस्यसंख्या ३३ पर्यंत जाण्याचा मार्ग मोकळा होणार आहे

संघाच्या अध्यक्ष निवडीची प्रक्रिया आणि सत्ता समीकरणांच्या पार्श्वभूमीवर ही घडामोड अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. महायुती आणि समविचारी आघाडी यांच्यातील राजकीय रस्सीखेच सुरू असतानाच हे पत्र बाहेर आल्याने जिल्ह्याच्या सहकार वर्तुळात राजकीय चर्चांना उधाण आले आहे. शासननियुक्त संचालकांच्या वाढीवरून आणि त्यांना मिळणाऱ्या अधिकारांवरून विरोधी गटाकडून विरोध दर्शवला जात असून, नियम आणि कायदेशीर वैधतेबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या व्हायरल पत्रामुळे गोकुळच्या आगामी राजकारणात नवे वळण मिळण्याची चिन्हे दिसत आहेत.