कोल्हापूर : गोकुळ दूध संघातील अपात्र ठरविण्यात आलेल्या ४२७ दूध संस्था प्रकरणी गुरुवारी  ४ दूध संस्थांकडून मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंच मध्ये याचिका दाखल करण्यात आली आहे. 

या ४२७ दूध संस्थाना कोणतीही पूर्वसूचना न देता मतदानापासून वंचित ठेवण्याचा हेतू होता. या संस्थांना आतापर्यंत ठराव मागणीचे पत्र मिळालेले नाही, असे त्यांनी याचिकेमध्ये म्हटले आहे. या संस्था आमदार सतेज पाटील यांच्याशी संबंधित आहेत. कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळ दूध संघाची निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. काही संस्था नियमबाह्य पद्धतीने नोंदवण्यात आल्याची तक्रार शासनाकडे करण्यात आली आहे. याबाबत सुनावणी सुरू होती.गोकुळ संघाशी संबंधित ४२७ संस्था अपात्र ठरविण्याचा निर्णय सोमवारी विभागीय दुग्ध निबंधकाकडू जाहीर केला होता. हा सत्ताधाऱ्यांना धक्का मानला जातो. यामुळे या संस्थांना मतदानाचा अधिकार गमावण्याची वेळ आली आहे.

यानंतर आज जय जवान जय किसान दूध संस्था, खेबवडे ता करवीर, कौलव महिला सहकारी दूध संस्था, कौलव, ता राधानगरी , कै दिनकराव आ कवडे दूध संस्था, आवळी बुद्रुक, ता राधानगरी, सुरभी सहकारी दूध संस्था मौजे वडगाव तालुका हातकलंगले या दूध चार संस्थांच्या नावे सुट्टीचे न्यायालय असल्यामुळे याचिका  दाखल करण्यासाठी परवानगी मागितली होती. त्यावर न्यायालयाने याचिका दाखल करण्याची परवानगी दिली. या संस्थांच्या वतीने ॲडव्होकेट श्रीकृष्ण गणबावले काम पहात आहेत.

काय घडले होते?

कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीवरून राजकारण तापले आहे. गोकुळ मधील भ्रष्टाचारी कारभाराची चर्चा होऊ लागल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गोकुळ प्रथमच अधिकाऱ्यांचे प्रशासक मंडळ नियुक्त केले आहे. तर गोकुळ मधील वाढवण्यात आलेल्या संस्थांच्या पात्रतेबाबत निर्णय घेण्यासाठी कृष्णा ठाकरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या संस्थांबाबत सुनावणी सुरू होती.दरम्यान, दुग्ध निबंधकायांनी गोकुळच्या ४२७ संस्था अपात्र ठरवल्या आहेत. हा सत्ताधारी गटाला धक्का बसला आहे. यामुळे गोकुळच्या निवडणुकीच्या राजकारणाला कलाटणी मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यामध्ये अवसायनात निघालेल्या १३०८ संस्थांचा समावेश नाही. गोकुळ कडे ५४२७ नोंदवल्या गेल्या आहेत. त्यातील या १३०८ संस्थाही अशाच पद्धतीने अपात्र ठरण्याची जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.