कोल्हापूर : गोकुळ दूध संघाची निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी निवडणूक विभागाकडून ठोस पावले पडू लागली आहेत. या निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून करवीरच्या उपविभागीय अधिकारी मोसमी चौगुले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शिस्तबद्ध कार्यप्रणालीसाठी ओळखल्या जाणाऱ्या चौगुले यांची निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून निवड झाल्यामुळे एकूणच प्रक्रिया नियोजनबद्धरित्या पार पडली जाईल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीसाठी राजकीय घडामोडी गतिमान झाल्या आहेत. दुसरीकडे पात्र ठराव धारकांवरून वेगळाच वाद सुरू आहे. याच मुद्द्यावरून न्यायालयीन प्रक्रियाही होताना दिसत आहे. हे एकीकडे सुरू असताना आता प्रत्यक्ष निवडणूक घेण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल पडले आहे. गोकुळच्या निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी कोण असणार याची चर्चा होती. जिल्हाधिकारी कार्यालयातील दोन- तीन अधिकाऱ्यांच्या नावाची चर्चा सुरू होती. याचवेळी सहकार विभागातील काही अधिकाऱ्या ंपैकी एका जबाबदार अधिकाऱ्याकडे ही कामगिरी सोपवली जाईल असेही बोलले जात होते. या पार्श्वभूमीवर निवडणूक सहकार प्राधिकरणाचे सचिव अशोक गाडे यांच्या स्वाक्षरीने मोसमी चौगुले यांच्याकडे निवडणुकीचे धुरा सोपवण्यात आली आहे.
विभागीय उपनिबंधक दुग्ध पुणे यांनी १२ ऑगस्ट रोजी गोकुळच्या निवडणुकीसाठी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध केली होती. पुढे ४ सप्टेंबर रोजी अंतिम मतदार यादी जाहीर करण्यात आली आहे. आता निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची घोषणा झाल्याने या प्रक्रियेला गती मिळणार आहे. यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने १० ऑगस्ट रोजी गोकुळची निवडणूक प्रक्रिया ६० दिवसात पूर्ण करणे बंधनकारक असल्याचे आदेश दिले होते. या सर्व घडामोडी लक्षात घेऊन चौगुले यांना कामगिरी पार पाडण्याचे आव्हान पेलावे लागणार आहे.
महत्वाच्या पदावर काम
उपविभागीय अधिकारी मोसमी चौगुले यांनी यापूर्वी इचलकरंजी, भोर (पुणे) येथे उपविभागीय अधिकारी म्हणूनही जबाबदारी पार पाडली आहे. त्यानंतर साताऱ्यात भूसंपादन क्रमांक नऊ येथे उपजिल्हाधिकारी म्हणून काम पहिले आहे. तेथून बदली होवून त्या सांगली जिल्हा निवासी उपजिल्हाधिकारीपदी रुजू होत्या.
