कोल्हापूर : गोकुळचे ‘हलाल प्रमाणपत्र’ प्रकरण चागलेच तापताना दिसत आहे. या मुद्द्यावरून कोल्हापुरात हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या आहेत. कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ म्हणजेच ‘गोकुळ’ने ‘हलाल’ प्रमाणपत्र तात्काळ रहित करा, अशी मागणी हिंदु जनजागृती समिती आणि हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी गोकुळच्या प्रशासकांकडे निवेदनाद्वारे शुक्रवारी करण्यात आली. ‘गोकुळ’ने हलाल प्रमाणपत्र घेण्याचा निर्णय रहित न केल्यास प्रसंगी गोकुळवर मोठा मोर्चा काढण्याची चेतावणी देण्यात आली.
हिंदु जनजागृती समिती आणि समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने गोकुळचे प्रशासक, तसेच कोल्हापूरचे जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांना आज याबाबत निवेदन देण्यात आले. त्यात म्हटले आहे की, गोकुळ’ने ‘हलाल’ प्रमाणपत्र घेतल्याचे समोर आले आहे. परदेशात निर्यात करण्यासाठी या प्रमाणपत्राची आवश्यकता असल्याचे कारण पुढे केले जात आहे; मुळात दूध आणि दुग्धजन्य उत्पादनांना भारतात पुरेसा बाजार उपलब्ध असतांना आखाती देशात ही उत्पादने विकण्याची आवश्यकता काय ? अजून संपूर्ण भारतात गोकुळ दूध पोहोचले नसताना, ते मुस्लिम देशांना पाठवायचा अट्टाहास का केला जात आहे ? हलाल प्रमाणपत्र देणारी ‘जमियत उलेमा हिंद’ ही संस्था हलालच्या पैशांचा वापर जिहादी आतंकवाद्यांचे खटले लढण्यासाठी करते, तर गोकुळचे दूध घेणार्यांचा पैसा जिहाद्यांच्या सुटकेसाठी खर्च होणार का ? असा प्रश्न हिंदूंच्या मनात उपस्थित होत आहे. त्यामुळे राष्ट्रहितासाठी ‘गोकुळ’चे ‘हलाल’ प्रमाणपत्र रहित करावे, या मागणीचे निवेदन गोकुळच्या प्रशासकांनी यावर प्रशासकीय मंडळाच्या बैठकीत चर्चा करून पुढील निर्णय घेऊ असे आश्वासन शिष्टमंडळास दिले.
या प्रसंगी महाराजा प्रतिष्ठानचे संस्थापक निरंजन शिंदे, ‘नमो नमो’चे जिल्हाध्यक्ष विक्रमसिंह जरग, सामाजिक कार्यकर्ते शशी बीडकर, मंदिर महासंघाचे अशोक गुरव, मराठा तितुका मेळवावाचे योगेश केरकर, बजरंग दलाचे प्रतीक कुलकर्णी, हिंदू एकता आंदोलनाचे शहराध्यक्ष गजानन तोडकर, शिवसनेचे उपजिल्हाप्रमुख उदय भोसले आणि किशोर घाटगे, हिंदु जनजागृती समितीचे शिवानंद स्वामी, साधना गोडसे, हिंदु राष्ट्र समन्वय समितीचे रामभाऊ मेथे, किरण कुलकर्णी, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे करवीर तालुकाप्रमुख राजू यादव, हिंदु महासभेचे उपाध्यक्ष विकास जाधव, शहराध्यक्ष प्रशांत पाटील, श्रीकांत जाधव, पॉजिटिव्ह वॉच’चे शेखर धोंगडे, मानवाधिकार संघटनेचे राजेश वाघमारे, सुयोग काकतकर, हिंदू विधीज्ञ परिषदेचे बाबासाहेब भोपळे उपस्थित होते.
‘हलाल प्रमाणिकरण’ बंद करा
भारत सरकारच्या अधिकृत‘भारतीय अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरण’ आणि ‘अन्न व औषध प्रशासन’ या संस्था उत्पादनांचे प्रमाणिकरण करत असतांना वेगळ्या ‘हलाल प्रमाणिकरणा’ची आवश्यकता काय ? त्यामुळे भारतासारख्या धर्मनिरपेक्ष देशात धर्माधारित ‘हलाल प्रमाणिकरण’ व्यवस्था तात्काळ बंद केली पाहिजे. विविध ठिकाणी खर्च होणारा पैसा हा केवळ आणि केवळ मुसलमान वा इस्लामी देशांना मिळावा, हा यामागचा एक उद्देश आहे. जर हे दूध ‘हलाल’ आहे, तर ते घेण्यासाठी हिंदूंनी पैसे का द्यावेत ? त्यामुळे यावर वेळीच कठोर कारवाई न केल्यास देशाचे मोठे नुकसान होईल. त्यामुळे गोकुळ दूध संघाचे ‘हलाल’प्रमाणपत्र तात्काळ रहित करावे. ज्या अध्यक्ष, संचालक यांच्या काळात हे प्रमाणपत्र घेतले त्यांची सखोल चौकशी करण्यात यावी, अशीही मागणी हिंदु जनजागृती समितीचे शिवानंद स्वामी यांनी केली आहे.
