कोल्हापूर : दुधामध्ये प्रति लिटर दोन रुपयाची वाढ करण्याचे आश्वासन दिले असताना महायुतीच्या आघाडीत असलेल्या तिन्ही मावळत्या अध्यक्षांनी गेल्या पाच वर्षांमध्ये म्हैस दुधात १६ रुपये व गाय दुधात १२ रुपयांची वाढ केली. आता महायुतीच्या जाहीरनाम्यामध्ये म्हैस दुधाला ७ रुपये व गाय दुधाला ३ रुपये वाढ करण्याचे आश्वासन दिले आहे. परंतु गत अनुभव पाहता गोकुळ दूध संघ पुढील पाच वर्षात म्हैस दुधाला प्रति लिटर २० रुपये तर गाय दुधाला १५ रुपयांची वाढ देईल याबद्दल माझ्या मनात शंका नाही,असा विश्वास वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी रविवारी केले.
गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीसाठी छत्रपती शाहू शेतकरी विकास आघाडीच्या प्रचार शुभारंभ आणि जाहीरनामा प्रकाशन कार्यक्रम येथे आयोजित केला होता. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून मुश्रीफ बोलत होते. गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत महायुतीचा विजय निश्चित आहे. यासाठी ठरावधारकांना सहलीवर नेण्याची नियोजन केले आहे. त्यांच्याकडून मतदान कसे करायचे याचे प्रबोधन केले पाहिजे. कृत्रिम गर्भधारणेसाठी जिल्हा बँकेच्या माध्यमातून २० हजार रुपयांचे अनुदान देण्यात येईल, असे मुश्रीफ यांनी नमूद केले. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सतेज पाटील यांचा समाचार घेतला. ते म्हणाले, महायुतीचे निर्णय मुंबईत होतात असे विरोधक बोलत आहेत. राज्यात महाविकास आघाडीचे शासन असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या माध्यमातून पॅनलची रचना झाली होती. असे मुद्देबाहेर काढले तर विरोधकांची काय अवस्था होईल, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
मुश्रीफांची कॉलर
संपूर्ण पॅनलला एकसमान मतदान झाले पाहिजे. मतदान कमी जास्त झाले तर हसन मुश्रीफ यांची कॉलर ताट राहणार नाही, अशी टिपणीही त्यांनी केली. जन सुराज्यशक्ती पक्षाचे संस्थापक आमदार विनय कोरे यांनी दुग्ध व्यवसायाबद्दल अभ्यासपूर्ण भाषण केले. अमूल दूध संघापेक्षा गोकुळच्या रचना ही वेगळी आहे. महानंदासारखी राज्याचा शिखर संघ संस्था बंद पडली असताना गोकुळने चांगला कारभार करून लौकिक मिळवला असल्याचे त्यांनी सांगितले. पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी विरोधकांकडून समाज माध्यमातून व्यक्तिगत टीका केली जात आहे. या बुद्धिभेद करणाऱ्या प्रचाराला बळी न पडता महायुतीचे उमेदवार विजयी करण्यासाठी पुढील दहा दिवस जीवाचे रान करण्याचे आवाहन केले.
घटस्थापना अन सीमोलघ्घ
पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी या कार्यक्रमाच्या निमित्ताने महायुतीच्या विजयाचा घट बसला असून आपल्याला निकाला दिवशी विजयाच्या गुलालाची उधळण करायची असल्याचे म्हटले. तर, मंत्री हसन मुश्रीफ यांनी महायुतीचा विजय निश्चित असल्याने निकाला दिवशी सीमोलघ्घन होईल, असा उल्लेख केला. खासदार धनंजय महाडिक तसेच चंद्रदीप नरके, अमल महाडिक, अशोक माने, राहुल आवाडे आदी आमदार, समित कदम, सुरेश हाळवणकर,उमेदवार उपस्थित होते.
