कोल्हापूर : गोकुळ दूध संघामध्ये प्राधिकारी अधिकारी मंडळ स्थापन झाल्याने तेथील भ्रष्ट कारभाराचा आता अंत झाला आहे. गोकुळ मधील भ्रष्टाचाराची प्रकरणे यापुढे अधिक प्रमाणात उघडकीस येतील. अति तेथे माती होते हे या घटनाक्रमातून दिसून आले आहे, असे मत आमदार शिवाजी पाटील यांनी व्यक्त केले.

गोकुळ दूध संघाचे मुदत संपल्याने पुढे काय घडणार याकडे लक्ष लागले होते. पण येथे प्राधिकारी अधिकारी मंडळ स्थापन झाल्याच्या निर्णयाचे स्वागत करून आमदार शिवाजी पाटील यांनी सांगितले की, गोकुळ दूध संघाच्या माध्यमातून मनमानी करणाऱ्या नेत्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चाप लावला आहे. शेतकऱ्यांना दूध उत्पादक शेतकऱ्यांना चांगले दिवस आल्याचे पाहायला मिळेल. तसेच वाढवण्यात आलेल्या ११०८ संस्थांवर कठोर कारवाई केली जाणार आहे. गोकुळच्या भ्रष्ट कारभारातील लढ्याला प्रकाश बेलवाडे यांची मोलाची साथ मिळाल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले.

तुकाराम मुंढे हवेत

गोकुळ’वर प्रशासक म्हणून आयएसएस अधिकारी तुकाराम मुंडे यांची नियुक्ती करावी, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात येणार असल्याची माहिती आमदार शिवाजी पाटील यांच्याकडून देण्यात आली होती. गोकुळ संघाच्या शक्यतेने पुरावे नष्ट करण्यासाठी घातपात होण्याची शक्यता आमदार शिवाजी पाटील यांनी व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर गोकुळ शिरगाव, ताराबाई पार्क आणि मुंबई येथील कार्यालयांना तातडीने पोलिस संरक्षण देण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती. जिल्ह्यातील १३२० संस्थांचे सुनावणी पूर्ण झाल्यानंतरच गोकुळची निवडणूक घेण्याचा निर्णय न्यायालयाने दिला आहे. ज्यांच्या काळात जिल्ह्यातील दूध संस्था अवसायनात काढण्यात आल्या होत्या, त्या तुकाराम मुंडे यांनाच प्रशासक म्हणून नियुक्त करावे, अशी मागणी आमदार पाटील हे मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे करणार असल्याचे त्यांनी सांगितले होते.

बोगस संस्थांना लगाम

तर प्रकाश बेलवाडे यांनी गोकुळ मधील कारभाराच्या शेवट झाला आहे. तेथे लोकाभिमुख कारभार यापुढे पाहायला मिळेल. बोगसरित्या वाढवण्यात आलेल्या संस्थांचे अस्तित्व यापुढे संपुष्टात येईल. लवकरच गोकुळची दोष मुक्त मतदान प्रक्रिया सुरू होऊन भ्रष्टाचाराचा अंत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

प्रकाश बेलवाडे कोल्हापूरच्या ‘गोकुळ’ दूध संघातील भ्रष्टाचार आणि बेकायदेशीर संस्था स्थापनेविरोधात न्यायालयीन लढाई लढणारे गर्जना संघटनेचे नेते आहेत. त्यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना कोल्हापूर सर्किट बेंचने गोकुळच्या विद्यमान संचालक मंडळाला मुदतवाढ नाकारली आहे.